रत्नागिरीत काल (ता. ४) रात्री गोवंश हत्या प्रकार घडल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. अशी प्रवृत्ती ठेचून काढली जाईल. ज्याने हे कृत्य केले आहे, त्याला शोधून कडक कारवाई केली जाईल. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिला पाहिजे. गोवंश हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला कडक शिक्षा होईल. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तशा सूचना मी पालकमंत्री म्हणून पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एमआयडीसी परिसरात गोवंश हत्या प्रकरण उघडकीस आले. यामुळे कालपासून वातावरण ढवळून निघाले. यावर पालकमंत्री म्हणाले, “गुन्हेगाराला शोधून कडक शासन करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रवृत्तीचे समर्थन राज्य शासन किंवा मुख्यमंत्री करत नाहीत, तसेच कोणताही कायदा, सुव्यवस्था भंग होऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनीध खात्रीशीर माहिती प्रसारमाध्यमांना द्यावी. संवेदनशील विषयाचा परिणाम कुठेही होऊ शकतो.
त्यामुळे खात्री झाल्याशिवाय बातमी देऊ नका, अशी विनंती पालकमंत्र्यांनी केली. कालच्या प्रकारानंतर हिंदू संघटनांना देखील आवाहन करतो की, गुन्हेगारांपर्यंत आम्ही नक्की पोहोचू. कोणीही हिंदूंच्या भावनांशी खेळू नये. पालकमंत्री म्हणून मी कठोर भूमिका मांडली आहे. आज सकाळपासून पोलिसांशी दोन-तीन वेळा चर्चा झाली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक एकत्रित येऊन काम करतील. पोलिस, जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी नेमावीत.” पथक
नीलेश राणे यांची भूमिका – गोवंश हत्या प्रकरणानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्त केलेली भूमिका प्रत्येकाची आहे. या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
गोशाळेचा पर्याय – रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे आहेत. या गुरांचा सांभाळ करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सोमेश्वर शांतिपीठ येथील गोशाळेचा पर्याय सुचवला आहे. या प्रस्तावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन मुख्याधिकारी बाबर यांना सूचना देऊन मान्यता देण्याची सूचना करतो, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.