केंद्र शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी विविध विकासकाम करिता १२०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०२३ ते २४ या वर्षाकरिता राज्य शासनाने ३०० कोटी रुपये जिल्हा नियोजनसाठी मंजूर केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ८.३० ते १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध विकास काम साठी आलेल्या निधीचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. साडेसात वर्षांनंतर पहिल्यांदाच इतका निधी जिल्ह्यासाठी ल आला आहे. राज्य शासनाच्या सिंधू- रत्न योजनेतून ९ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यातून आंबा बागायतदारांना आंबा वाहतुकीसाठी २ कोल्ड स्टोरेज रॅम्प पणन महामंडळाकडे देण्यात येणार आहेत.
मच्छिमार महिलांसाठीही या पॅकेजमधून मदत केली जाणार आहे. यामध्ये दुचाकी, तीनचाकी वाहने देण्यासाठी सबसिडी दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिली जाणार आहेत. मसाला लागवड, हळद लागवड आदी उत्पादनांसाठीही मदतीचा हात दिला जाणार आहे. दुग्धसंकलनासाठी गाई, म्हशी या योजनेतून देण्यात येणार आहेत. खेकडा पालन व्यवसायासाठी ४ कोटी ७४ लाख रुपये उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.एमआयडीसी लगतच्या रस्त्यांसाठी ४१ कोटी रुपये, क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी २० कोटी ६३ लाख, पंतप्रधान ग्रामविकास योजनेतून १७१ कोटी रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडकमधून १६ कामांसाठी ४२ कोटी ९७ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेला १३५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामध्ये शाळा दुरुस्ती, नवीन शाळांचे बांधकाम, साकव यांची उभारणी होणार आहे. विमानतळ टर्मिनन्ससाठी २७ हेक्टर जागेचा ताबा घेण्यात आला आहे.