कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज झाला असून, एसटी बसस्थानक, रेल्वेस्टेशनसह महामार्गावर २२ ठिकाणी आरोग्यपथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके १७ सप्टेंबरपर्यंत राहणार आहेत. कोकणात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी लाखो चाकरमानी गावात दाखल होतात. दोन दिवसांपासून चाकरमान्यांनी गावाकडे येण्यास सुरुवात केली आहे. गेले काही दिवस ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्याचा फटका आरोग्यावर होत असून, सध्या जिल्ह्यात सर्दी, ताप, डेंगी, मलेरिया या साथी पसरलेल्या आहेत. साथीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून, त्यांच्यावर त्वरित प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी २२ ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके ४ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबरपर्यंत असणार आहेत. परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांची तपासणी केली जाणार आहे. खेडमध्ये पाच ठिकाणी ही पथके आहेत. हॉटेल अनुसया, हॅप्पी धाबा, भोस्ते घाट, भरणेनाका, खेड रेल्वेस्टेशन, चिपळूण सवतसडा पेढे, कळंबस्त फाटा, बहादूरशेख नाका, अलोरे घाटमाथा, सावर्डे, चिपळूण रेल्वेस्टेशन, आरवली, संगमेश्वर एसटी स्टॅण्ड, वांद्री, मुर्शी, संगमेश्वर रेल्वेस्टेशन, हातखंबा तिठा, पाली, रत्नागिरी रेल्वेस्टेशन, वेरळ, कुवे गणपती मंदिर, राजापूर जकातनाका अशा २२ ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत.