21.9 C
Ratnagiri
Monday, January 5, 2026
HomeChiplunतलाठी भरतीसाठी ५०० किलोमीटरची पायपीट, उमेदवारांना खर्चाचा भुर्दंड

तलाठी भरतीसाठी ५०० किलोमीटरची पायपीट, उमेदवारांना खर्चाचा भुर्दंड

राज्य सरकारने दीर्घकाळानंतर ४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी भरती जाहीर केली.

तलाठी भरती परीक्षेसाठी जादा शुल्कानंतर आता विद्यार्थ्यांवर प्रवासभाडे आणि राहण्याच्या खर्चाचा बोजा पडला आहे. आधीच बेरोजगारी त्यात हा वाढीव खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न अनेक गरीब विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. टीसीएस कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या तलाठी भरती परीक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांना तीन जिल्ह्यांचे पसंतीक्रम पर्याय द्यायचे होते. या तीनपैकी एकाच जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले जाणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते स्वत: राहत असलेला जिल्हा पहिला पसंतीक्रम तर आजूबाजूचे जिल्हे दुसरा आणि तिसरा पसंतीक्रम म्हणून निवडला होता.

काही विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यासह ज्या जिल्ह्यात नातेवाईक आहेत ते जिल्हे परीक्षा केंद्रासाठी पर्याय म्हणून निवडले होते. मात्र, वेद्यार्थ्यांनी दिलेल्या ३ पर्यायांपैकी परीक्षा केंद्र न देता भलत्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले आहे. १७ ऑगस्टला घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी हाच गोंधळ झाला. आज दुसऱ्या टप्प्यात परीक्षा घेण्यात आली तेव्हाही अनेक विद्यार्थ्यांना लांब लांबचे केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ४०० ते ५०० किलोमीटर प्रवास करून परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जावे लागले. काही विद्यार्थी एक दिवस आधीच आपल्या केंद्रावर दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना प्रवासासह राहण्याचा जेवणाचा खर्चही करावा लागला आहे.

राज्य सरकारने दीर्घकाळानंतर ४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी भरती जाहीर केली. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात आता दूरचे परीक्षा केंद्र आल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular