एसटीची सेवा संपकाळामध्ये ठप्प झालेली आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. सर्व संपकरी कामावर हजर झाले असून राज्यात सद्य स्थितीला जवळपास १०० टक्के बसेस धावू लागल्या आहेत. या बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून एसटीला २२ ते २७ एप्रिल दरम्यान तब्बल ७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान,आगामी उन्हाळी सुट्यांचा कालावधी लक्षात घेता एसटी प्रशासनाकडून जादा बसेसचेही नियोजन करण्यात येत आहे.
विलीनीकरणाची मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांच्या शासकीय विलीनीकरणाच्या मागणीबाबत उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत संपकरी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात औले होते. संपकाळात करण्यात आलेली कारवाई मागे घेत, कर्मचारी रुजू करून घेण्याच्या सूचनादेखील न्यायालयाने दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संपात सहभागी झालेले कर्मचारी टप्प्या टप्प्याने कामावर हजर झाल्याचे दिसत आहेत.
तब्बल सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे सर्वत्र बसस्थानकामध्ये शांतता पसरल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र, आता सर्व बसेस सुरु झाल्याने नागरिकांची वर्दळ देखील वाढली असून, राज्यातील सर्वच बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. पुरेशा बसेस असल्यामुळे प्रवाशांकडूनही समाधान व्यक्त होत असल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळत आहे.
बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून २२ ते २७ एप्रिलदरम्यान साधारणत: ७७ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. आगामी काळात अधिकाधिक उत्पन्न प्राप्त व्हावे या उद्देशाने नियोजन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभागीय नियत्रंकासह अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.