चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर २६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात दहा हजारपेक्षा जास्त नागरिक सहभागी होतील, असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. या आंदोलनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याचीं जबाबदारी रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागेल असेही मुकादम यांनी कळविले आहे. चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे ऑनलाईन भूमिपूजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले होते.तीन ते चार वर्षे झाली, तरी या मार्गाच्या कामाला अद्याप सुरुवात, झालेली नाही.
या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरु करावे, चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्थानकावरून अनेक वर्षांची मागणी केल्याप्रमाणे चिपळूण- दादर पॅसेंजर गाडी नव्याने सुरु करावी. तसेच चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील लेवल क्रॉसिंग फाटक क्र. येथे उड्डाण पूल तातडीने बांधण्यात यावा, यासह स्थानिकांची भरती अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाईल. या सर्व मागण्या २६ जानेवारीच्या आत मान्य न झाल्यास चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये चिपळूणसह गुहागर व खेड तालुक्यातील १५ गाव धामणंद, तसेच काडवली व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.