प्रत्येक शाळेमध्ये रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत म्हटले जाते. जिथे शिक्षण दिले जाते अशा कोणत्याही भाषेच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या संस्थांमधून देखील आत्ता राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकतंच मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक केलं आहे. वर्ग सुरू होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना आता राष्ट्रगीत म्हणावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्यांतल्या मदरशांमध्येही राष्ट्रगीत बंधनकारक करण्यात यावं अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. भोसले म्हणाले, उत्तरप्रदेशातल्या सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्यात आले आहे. धार्मिक शिक्षण, शारिरीक शिक्षणाबरोबर राष्ट्रभक्ती रुजणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही योगी सरकारच्या निर्णयाचं स्वागत आणि त्यांचं अभिनंदन करतो. तसंच महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतो की त्यांनीसुद्धा असाच निर्णय घ्यावा आणि राज्याच्या सर्व मदरशांत राष्ट्रगीत बंधनकारक करावं”.
उत्तर प्रदेश सरकारने नुकताच मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्याचा निर्णय घेतला असून, त्याप्रमाणे नियमाप्रमाणे राष्ट्रगीत म्हटलं जातंय की नाही, त्याचे पालन होते आहे कि नाही, याची तपासणी केली जाणार आहे. सकाळी वर्ग सुरू होण्यापूर्वी दुआ पठण केलं जातं. त्याच वेळी आता दुआ पठणासोबतच राष्ट्रगीत म्हणणंही बंधनकारक असणार आहे.
उत्तर प्रदेशात आता सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरु होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणावं लागणार आहे. आजपासूनच या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या रजिस्ट्रारने सर्व अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.