नगर परिषद निवडणुकीचा शंखनाद झाला असतानाच भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण हे बुधवारी खेडमध्ये येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला रविंद्र चव्हाण मार्गदर्शन करणार असून आगामी नगर परिषद निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल आणि त्याची घोषणा रविंद्र चव्हाण बुधवारी करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. महायुतीकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका, कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे (शिंदे गट) प्राबल्य मोठं आहे. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपला निवडणुकीच्या तोंडावर बळ मिळाल आहे त्यामुळे थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेड येथे पदाधिकारी बैठक व कार्यकर्ता मेळाव्याचे आणि पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहात करण्यात आल आहे.
मोठ्या घोषणेची शक्यता – भाजपाकडून याच कार्यक्रमात नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी दंड थोपटण्यात येणार असून भाजपा खेड, नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. खेड नगर परिषद निवडणुकीसाठी वैभव खेडेकर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकरांच्या भाजपा प्रवेशानंतर पहिलीच बैठक व कार्यकर्ता मेळावा बुधवारी होत असल्याने मोठ्या राजकीय घोषणेची शक्यता आहे.
भाजप स्वबळावर? – मनसेच्या स्थापनेनंतर राज्यात पहिली नगरपरिषद निवडून आणण्याचा मान वैभव खेडेकर यांनी मिळवला होता. त्यांनी खेडमध्ये मनसेची बहुम ताने सत्ता आणली होती. खेड नगर परिषदेचे वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. खेड शहर परिसरावर त्यांची मोठी कमांड आहे. त्यामुळे आता खेड नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपा स्वबळाची घोषणा करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वैभव खेडेकर यांच्याबरोबर प्रवेश केलेले काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. खेडमध्ये होणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये अनेकांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते.
वैभवी खेडेकरांना उमेदवारी? – खेड नगरपरिषद जिंकण्यासाठी. वैभव उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली आहे. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे महिला राखीव आहे. त्यामुळे खेड नगराध्यक्षपदाची संधी ही वैभव खेडेकर यांच्या पत्नी सौ. वैभवी खेडेकर यांना मिळण्याची शक्यता आहे. वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव व संपर्क लक्षात घेता भाजपाकडून सौ. वैभवी खेडेकर यांच्या नावावर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर वैभव खेडेकर यांना निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याची संधी असून यामध्ये यश मिळाल्यास वैभव खेडेकर यांची पुढील वाटचाल महत्वाची ठरवणार आहे.

