आज दिनांक २८ मार्च रोजी एस.टी. स्टँड रत्नागिरी येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून भाजपच्या वतीने मागील ३ वर्षापासून रखडलेल्या कामाबद्दल निषेध नोंदविण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी मध्यवर्ती एस.टी. स्टँडचे काम मागील ३ वर्षे पासून कासवाच्या गतीने सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री गल्ली पासून मुंबई पर्यंत सत्तास्थानी असलेली मंडळी अद्ययावत मध्यवर्ती एस.टी. स्थानकाच्या बांधकामाबद्दल उदासीनच आहेत. एस.टी. महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही देखील परिस्थिती जैसे थेच आहे. एक प्रकारे जनतेला वेठीला धरण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाकर्त्या महाआघाडी शासनाच्या कारभारामुळे रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला एस.टी. स्टँडचे गेली ३ वर्षपासून बांधकाम ठप्प आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एस.टी. प्रवाशांना एकतर संपामुळे आणि उन्हा तान्हातून नागरिकांना सहन करावा लागत असणारा त्रास त्यामुळे एक प्रकारे जनतेस वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे. मध्यवर्ती एस.टी. स्टँड नसल्याने पॅसेंजरचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रत्नागिरीतील स्टँड नजीकच्या रस्त्यावर अतिरिक्त ताण येत आहे, आणि इतर खाजगी वाहने अतिरिक्त पैसे घेत असल्याने शारीरिक प्रमाणे आर्थिक सुद्धा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. स्टँड परिसरात असलेले छोटे-मोठे व्यापारी वाहनांच्या होणाऱ्या गर्दीमुळे अडचणीत आले आहेत, परंतु, या कोणत्याच गोष्टीचा परिणाम महाआघाडीच्या ढिम्म शासन कर्त्यांवर होत नाही.
रत्नागिरीचे पालकमंत्री परिवहन मंत्री आहेत. रत्नागिरीचे लोकप्रिय प्रतिनिधी कॅबिनेटमध्ये आहेत. मात्र रत्नागिरी एस.टी. स्टँड आणि रत्नागिरीकर जनता मात्र निराधार आहे. रत्नागिरीतील नागरिकांच्या तीव्र भावना ढिम्म आघाडी सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आणि थांबलेले एस.टी. स्टँडचे काम वेगाने सुरू करावे या मागणीसाठी त्रस्त नागरिक बंधू-भगिनींनी या लाक्षणिक उपोषणात सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी असे आवाहन भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.