25.4 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriआंबाघाटात अनेक ठिकाणी अपघाताचा धोका

आंबाघाटात अनेक ठिकाणी अपघाताचा धोका

माती वाहून गेल्यास हा रस्ता पुन्हा खचण्याचा धोका आहे.

मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे आंबाघाट वाहतुकीस अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. ठिकठिकाणी साचलेला चिखल, खड्ड्यांमुळे चाळण झालेला रस्ता आणि खोदकामामुळे दरड कोसळण्याची भीती यामुळे महामार्गावरून प्रवास हा धोकादायक ठरत आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे हा घाट पुन्हा धोकादायक झाला आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गाचे मुर्शी ते आंबा हा घाटरस्ता सुमारे २० किलोभीटरचा आहे. दोन वर्षांपूर्वीच अतिवृष्टीमुळे हा घाट काही ठिकाणी खचला होता. त्या वेळी हा घाट २० दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. धोकादायक ठिकाणची डागडुजी करून हा घाट सुधारण्यात आला होता; पण आता मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे हा घाट पुन्हा धोकादायक झाला आहे.

महामार्गाचे मुर्शी ते कळकदरादरम्यान काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यालगत खोदकाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वरून मोठमोठे दगड सुटून खाली आले आहेत. हे दगड सध्यातरी महामार्गावर आलेले नसले तरी मोठा पाऊस झाल्यास् दरड कोसळून रस्त्यावर येण्याची शक्यता दाट आहे. खोदकाम केलेल्या काही ठिकाणी माती रस्त्यावर येऊ नये म्हणून मातीची पोती भरून ती एकावर एक रचून ठेवण्यात आली आहेत; पण खोदकाम केलेला भाग खूप मोठा आहे आणि त्या मानाने रचण्यात आलेली पोती ही अत्यल्प असल्याने हा आडोसा अत्यंत तुटपुंजा ठरण्याची शक्यता आहे.

क्रशरमुळे रस्त्यावर चिखल कळकदरानजीक रस्त्याच्या कामासाठी क्रशर आणून खडी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही खडीचे डंपर भरून वाहतूक सुरू असते. परिणामी, तेथे मोठ्या प्रमाणावर चिखल रस्त्यावर पसरलेला आहे.. घाटातील केवळ एकाच सुमारे ५० मीटरच्या पॅचचे अद्यापपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. हा पॅच सध्या उभारण्यात आलेल्या क्रशरला अगदी लागून आहे. त्यामुळे या भागातून चालक मोठ्या गतीने वाहने चालवत असतात. त्याचवेळी नेमके डंपर क्रशरवरून खडी घेऊन बाहेर येत असतात, अशावेळी अपघात होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी क्रशर उभारण्यात आलेला आहे तिथे कोणताही सूचनाफलक लावण्यात आलेला नाही.

पुन्हा रस्ता खचण्याची भीती – दोन वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी रस्ता खचला होता त्या ठिकाणी बांधकाम करून त्याची डागडुजी केली होती; पण आता दोन वर्षांनी त्या ठिकाणी रस्ता पुन्हा काहीसा खचल्याचे वाहने चालवताना जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अतिवृष्टी होऊन पुन्हा खालून माती वाहून गेल्यास हा रस्ता पुन्हा खचण्याचा धोका आहे. आधीच घाटाचा अरूंद रस्ता आणि त्यात एका बाजूला माती टाकून आणि खोदकाम करून आणखी अरूंद झालेला मार्ग यामुळे घाटातून वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. समोरासमोर दोन मोठी वाहने आल्यास अनेकवेळा चालकांना आपले वाहन बाजूला घेण्यास मोठी अडचण येत असते.

RELATED ARTICLES

Most Popular