जिल्ह्यातील डीएड, बीएड्द्धारकांना भरतीत प्राधान्याने स्थान देण्यात यावे, अशी मागणी डीएड, बीएड् संघटनेने केली आहे. तसे न केल्यास १५ ऑगस्टला बेरोजगार संघटना आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील जवळजवळ साडेसातशे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने परजिल्ह्यात गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दरवाजा उघडण्यासाठी प्राथमिक शिक्षक उपलब्ध नव्हता. या जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या निर्णयामुळे जिल्ह्याचा शैक्षणिक समतोल बिघडवला. या जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती विस्कळीत झालेली पाहून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्थानिकांना साद घातली आणि स्थानिक म्हणून प्रतिसाद दिला.
९ हजार रुपये मानधनावर प्रामाणिकपणे काम केले. जिल्हा परिषदेने अनेकवेळा मानधन देताना टाळाटाळ केली. कडक नियम लावले. त्याचा प्रचंड मानसिक ताण व त्रासही झाला. या परिस्थितीत सुद्धा आम्ही जिल्ह्याच्या जिल्ह्यातील मुलांच्या शैक्षणिक होणाऱ्या अडचणी समजून घेऊन खडतर परिस्थितीत कामकाज केले. शासनाची तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यांची नाचक्की होऊ दिली नाही. एप्रिल २०२४ नंतर शासनाने शिक्षक भरती केली. त्यानंतर सेवा कंत्राटी असल्याने समाप्त करण्यात आली आणि जिल्ह्यात अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. गरज आहे त्या वेळेला वापर केला आणि गरज संपल्यानंतर कचरा जसा उकीरड्यावर टाकतात तशी अवस्था केली.
अनेकदा शिक्षक भरतीमध्ये विविध भागांमध्ये लोक घोटाळे करून परीक्षेमध्ये आपला क्रमांक अव्वल करतात आणि नोकरी मिळवतात, हे प्रमाणाने सिद्ध झाले आहे. नवीन भरतीतही असे उमेदवार आहेत त्यांना काही अटींवर नेमणूक दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेषतः कोकणातील मुलांचा प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ राहण्याचा परिणाम गेली २० पेक्षा जास्त काळ भोगावा लागतो आहे. कोणत्याही चुकीच्या मार्गान नोकरी नको, ही भूमिका घेणारे स्थानिक लोकं आज अनेक वर्षे अडचणीत आहोत. कामाचा विचार करून शिक्षणसेवक म्हणून सेवेत सामावून घ्यावे.