24.2 C
Ratnagiri
Monday, January 5, 2026
HomeDapoliहर्णै बंदरातील मासेमारी अद्याप ठप्पच, पोषक वातावरणाची मच्छीमार बघतात वाट

हर्णै बंदरातील मासेमारी अद्याप ठप्पच, पोषक वातावरणाची मच्छीमार बघतात वाट

यंदाच्या हंगामाला सुरुवातीचे वातावरण मासेमारीसाठी अनुकूल होते; परंतु दोन दिवसांनी वातावरण बिघडले.

रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीचा श्रीगणेशा १ ऑगस्ट पासून झाला. परंतू, केवळ या मुहूर्ताच्या दिवशीच वातावरण चांगले होते; नंतर दोन दिवसांनी वातावरण पुन्हा बिघडले. पावसाचे प्रमाण वाढल्याने, मासेमारीकरिता गेलेल्या मच्छीमारांची धावपळ उडाली. मुहूर्ताच्या सुरवातीच्या दोन दिवसात जेमतेम ५० नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. पुढे वातावरणाचा अंदाज घेऊन एकूण किमान १२५ नौका मासेमारीकरिता समुद्रात गेल्या होत्या. मासेमारीस गेलेल्या मच्छीमारांपैकी केवळ ५० टक्केच मच्छीमारांनाच बऱ्यापैकी मच्छी मिळाली, आणि उर्वरित मच्छीमारांना मात्र नुकसान सोसावे लागले आहे.

सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवामुळे हर्णै बंदरातील मासेमारी ठप्पच आहे. आजच्या परिस्थितीत ९५ टक्के नौका हंगाम सुरू होऊन देखील आंजर्ले खाडीतच उभ्या आहेत.अनंत चतुर्दशीनंतर वातावरण पोषक झाले तरच मासळी उद्योग व्यवस्थितरित्या सुरू होईल, असे येथील स्थानिक मच्छीमार बांधवांनी सांगितले आहे. एकदा मासेमारी करिता जाण्यासाठी सर्व सामान, डिझेल, सहा खलाशी, आणखी काही सामानासाठी किमान लाख-दीड लाख रुपये खर्च येतो. आणि मागील १-२ वर्षापासून धंदाच मंदावल्याने, सध्या मच्छीमार बांधवांची आर्थिक स्थिती खूपच खालवली आहे. तसेच २०१८ पासून डिझेल परतावाच मिळालेला नाही. परतावा जर मिळाला तर मच्छीमारांना या हंगामात उद्योग सुरू करण्यास उपयोगी ठरू शकेल.

गेल्या काही वर्षांपासून मासेमारीच्या सुरुवातीच्या मुहूर्ताच्या काळात समुद्रात चक्रीवादळ तसेच खराब हवामान असल्याने मासेमारी हंगामालाच उशिराने सुरुवात झाली होती. यंदाच्या हंगामाला सुरुवातीचे वातावरण मासेमारीसाठी अनुकूल होते; परंतु दोन दिवसांनी वातावरण बिघडले. मासेमारी ठप्प झाल्यामुळे बंदरातील सर्वच उद्योग ठप्प झाले आहेत. या हंगामाला सुरुवात करताना मच्छीमारांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हर्णै बंदरात हंगामामध्ये आजूबाजूच्या गावांमधील मिळून ८०० ते ९०० नौका मासेमारीकरिता येतात. तर कोणाकडे मासेमारीकरिता तयारी करण्याकरिता पैसाच नसल्यामुळे ते थांबले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular