रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसाने आंबा, काजूला आलेला मोहोर गळून वा काळा पडून शेतकरी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामध्ये आंबा-काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून आंबा- काजूला यावर्षी चांगला मोहोर आला आहे. त्याबाबत बागायतदार, शेतकरी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचवेळी झाडावरील मोहोर टिकण्यासह त्याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्यासाठी शेतकरी, बागायतदार यांनी विविध प्रकारच्या औषधांची फवारणीही केली. त्याच्यातून समाधानकारक फळधारणा झाली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे मोहोर गळून वा फळगळती होऊन वा ढगाळ राहिलेल्या वातावरणामुळे थ्रीप्स वा विविध किडींचा प्रादुर्भाव होऊन आंबा-काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती शेतकरी, बागायतदार यांच्याकडून वर्तवली जात आहे. अवकाळीमुळे मोहोर गळून आंबा-काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये खराब हवामानाची भर पडली आहे. पावसामुळे आंबा-काजूच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात याव्यात आणि नुकसानग्रस्त शेतकरी, बागायतदारांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार साळवी यांनी कृषिमंत्री मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.