27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriना. उदय सामंत व मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट…

ना. उदय सामंत व मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट…

जीवलग मित्रांप्रमाणे आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या" अशा शब्दांत त्यांनी सारे काही स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच राज्यात राजकीय घडामोडींना विलक्षण वेग आला. आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले? व कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे… कारण तशीच महत्त्वाची बाब असल्या खेरीज राज्याचे उद्योगमंत्री मध्यरात्री थेट अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतीलच कशाला?… त्याचीच चर्चा आता सुरु झाली आहे.

मध्यरात्री भेट – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दि. १५ ऑक्टो. रोजी जाहीर झाली, त्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री ना. उदय सामंत यांची मनोज जरांगे यांच्यासोबत भेट झाली. यावेळी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओ. एस. डी. श्री. मंगेश चिवटे हे देखील उपस्थित होते. ही भेट अंतरवाली सराटीमध्ये मध्यरात्री झाली.

सरपंचांच्या शेतात – या भेटीत तब्बल २ तास चर्चा झाली. अंतरवालीच्यासरपंचांच्याशेतात ना. उदय सामंत व मनोज जरांगे यांची ही भेट झाली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले. यावेळी काय चर्चा झाली याची माहिती बाहेर आली नाही, परंतु महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली असणार हे निश्चित.

आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला – श्री. मनोज जरांगे यांनी त्यांचा पहिला दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे घेतला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. त्यामुळे निवडणूक आयागोच्या पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशी म्हणजे सोम. दि. १४ ऑक्टो. मध्यरात्री ना. उदय सामंत यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

आपुलकीची सदिच्छा भेट – याबाबत पत्रकारांनी ना. उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले, “मी मुख्यमंत्र्यांच्या – कार्यक्रमासाठी घनसावंगीला गेलो होतो. तेथून येताना मला सरपंचांनी सांगितले की मनोज जरांगे या ठिकाणी मुक्कामाला आहेत. म्हणून मी आपुलकीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो.”

विचार व सूर जुळतात ! – ना. उदय सामंत यांनी पुढे सांगितले, “श्री. मनोज जरांगे यांचेशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे व स्नेहाचे संबंध आहेत. त्यांचे व माझे नेहमीच विचार जुळतात आणि सूर जुळतात. त्यामुळे कदाचित महाराष्ट्र शासनातर्फे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळोवेळी मला सांगण्यात येत असावे” असे त्यांनी सांगितले.

जरांगेंबद्दल आदर – त्यांनी पुढे सांगितले, “मनोज जरांगे यांच्याबद्दल माझ्या मनात सदैव आत्यंतिक आदराची भावना वसत आली आहे. त्याच भावनेने मी मनोज जरांगे यांना भेटायला गेलो, त्यांच्या सोबत भरपूर गप्पा मारल्या, चहा घेतला. जवळच्या मित्राला भेटतो आहोत असे आम्हा दोघांनाही वाटले.

मनसोक्त गप्पा – परंतु आपण मध्यरात्री त्यांच्या भेटीला का गेला? असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता ना. उदय सामंत यांनी सांगितले, “मनोज जरांगे तेथे मुक्कामाला असल्याचे मला समजले म्हणून जवळचा मित्र या नात्याने मी त्यांच्या भेटीला गेलो… जीवलग मित्रांप्रमाणे आम्ही रात्री उशीरापर्यंत मनसोक्त गप्पा मारल्या” अशा शब्दांत त्यांनी सारे काही स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular