राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी प्रकृती अस्वस्थेचे कारण देत आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांनी तसे पत्र पाठवले आहे. मयेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर सुदेश मयेकर यांची नियुक्ती शरद पवार यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
सोमवारी सुदेश मयेकर यांनी एक पत्रकार परिषद घेत आपण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. आपली या पदावर नियुक्ती झाली, त्याच्या काही दिवस आधीच आपल्यावर एन्जी ओप्लास्टी झाली होती. आता आपल्या आजाराचा त्रास अधिक वाढला आहे. त्यामुळे आपल्याला या पदावर काम करणे शक्य नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. आपल्याला इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. मात्र आजारपणामुळे पदाला न्याय देता येत नसल्याने आपण हे पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुदेश मयेकर यांचा राजीनामा स्विकारला जातो की वरिष्ठ तो फेटाळतात याची उत्सुकता आहे. त्याचसोबत जर का सुदेश मयेकर यांचा राजीनामा स्विकारला तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होते याविषयी देखील चर्चा सुरु झाल्या आहेत.