पॅरिसमध्ये सलग दुसरे ऑलिंपिक ब्राँझपदक मिळवून देणारा भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग याला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन देण्यात आले आहे. हुकमी हूँग फ्लिकर म्हणून दरारा निर्माण करणाऱ्या हरमनप्रीतने ऑलिंपिकमध्ये आठ सामन्यांतून सर्वाधिक १० गोल केलेले आहेत. हॉकी क्षेत्रातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार हरमनप्रीतला २०२० आणि २०२२ मध्येही मिळालेला आहे. सवर्वोत्तम हॉकी खेळाडूसाठीच्या या पुरस्कारासाठी पुन्हा नामांकन मिळणे हा सोठा सन्मान असल्याचे हॉकी इंडियाने म्हटले आहे. तर हॉकी विश्वातील नामवंत खेळाडूंमध्ये आपलाही समावेश झाला आहे आणि हे माझ्या संघसहकाऱ्यांशिवाय शक्य नाही, असे हरमनप्रीत म्हणाला. पॅरिस ऑलिंपिकमध्ये मी केलेल्या सर्व गोलांमध्ये सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी निर्माण केलेल्या संधींमुळे मी गोल करू शकलो, असेही हरमनप्रीतने सांगितले.
हे खेळाडू आहेत शर्यतीत – हरमनप्रीतसह या पुरस्काराच्या शर्यतीत नेदरलँडसचे थिएरी ब्रिंकमन, जोएप डी मोल, जर्मनीचा हनेस मुल्लेर आणि इंग्लंडचा झेंच वॉलेन्स हे खेळाडू आहेत. वर्षातील सर्वोत्तम हॉकी खेळाडूची निवड करताना २०२४ मध्ये झालेल्या सर्व सामन्यांचा विचार केला जाणार आहे. त्यात कसोटी सामने, प्रो हॉक लीग, हॉकी नेशन्स कप, ऑलिंपिक पात्रता स्पर्धा आणि ऑलिंपिकमधील सामने यांचा समावेश आहे.
हरमनची ऑलिंपिकमधील कामगिरी – हरमनप्रीतने पॅरिस ऑलिंपिकमध्ये १० गोल पेनल्टी कॉर्नरवर केले तर तीन गोल पेनल्टी स्ट्रोकवर केले. या स्पर्धेत सर्वाधिक गोल त्याच्याच नावावर आहेत. ही पॅरिस ऑलिंपिक आपल्यासाठी सर्वात फलदायी स्पर्धा होती आणि सहकाऱ्यांनी कठीण काळात दिलेले सहकार्य मोलाचे होते. विश्वकरंडक स्पर्धेत मला पेनल्टी कॉर्नरवर गोल करता येत नव्हते; परंतु सर्व सहकारी माझ्या पाठीशी उभे राहिले होते, अशी आठवण हरमनप्रीतने काढली. माझ्या अपयशाची खंत मला सहकाऱ्यांनी कधीच जाणवू दिली नाही. विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशाची भरपाई ऑलिंपिकमध्ये करण्याची जिद्द बाळगली होती.
सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणे हा सुद्धा मोठा सन्मान आहे. त्यासाठी सहकाऱ्यांनी कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास कायम ठेवला होता, त्यामुळे मी त्यांचा ऋणी असल्याचे हरमनप्रीतने सांगितले, ऑलिंपिकमध्ये पदक मिळवल्यानंतर हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स हॉकीचे विजेतेपद अपराजित कामगिरी करून राखले. या स्पर्धेतही सात गोल करणारा हरमनप्रीत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
हरमनप्रीतने देशाकडून २२६ सामने खेळताना एकूण २०५ गोल केले आहेत. अशी कामगिरी महान हॉकीपटू ध्यानचंद आणि बलबिर सिंग सीनियर यांनीच केलेली आहे. भारतीय हॉकीचे सुवर्णयुग पुन्हा आणायचे आहे. त्यासाठी कोठेही कमतरता ठेवायची नाही; परंतु हे स्वप्न मी एकट्याने पूर्ण करू शकत नाही तर त्यासाठी पाठीराख्यांचेही पाठबळ आवश्यक असल्याचे हरमनप्रीत म्हणाला.