शहरातील खड्यांबाबतचा असंतोष नुकताच उफाळून आला. काही पक्षांनी याचा निषेध करण्यासाठी रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. याची गंभीर दखल पालिकेने घेतली. डबरऐवजी कोल्डमिक्स आणि पावसाळी डांबराने शहरातील खड्डे भरण्यास सुरुवात झाली. पावसाची उघडीप मिळेल तसे खड्डे भरले जात आहेत. काही ठिकाणी पावसात वाहून गेलेला डांबरीकरणाचा एक लेअर खरडवून काढण्याचे काम सुरू आहे. शहरात काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरवात झाल्यानंतर काही भाग गुळगुळीत झाला; परंतु अनेक भागांमध्ये रस्त्यांचे काम झालेले नाही.
काँक्रिटीकरणाच्या कामासाठी डांबरीकरणाचा एक थर अनेक ठिकाणी टाकण्यात आला; परंतु पहिल्या पावसात हा थर वाहून गेला. अनेक ठिकाणी खड्डे पडले. इतर ठिकाणी जुना रस्तादेखील खड्ड्यात गेला. हे खड्डे एवढे मोठे झाले की, वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे खड्ड्यांविरुद्ध राजकीय पक्षांनी दंड थोपटले.
काही पक्षांनी खड्डे कोल्डमिक्सने भरावेत, अशी मागणी केली तर काही पक्षांनी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत पालिकेवर धडकले. यावरून शहरातील राजकारण चांगलेच तापले. तेव्हा पालिकेने पावसाची उघडीप मिळाल्यानंतर ठिकठिकाणी कोल्डमिक्स आणि पावसाळी डांबराचा वापरकरून खड्डे भरण्यात आले. आठवडा बाजारातील पटवर्धन हायस्कूलच्या प्रवेशद्वारेवर मोठा खड्डा कोल्डमिक्सने भरण्यात आला. शहरात अनेक ठिकाणी पालिकेने खड्डे भरले आहेत; परंतु अजून हे काम पूर्ण झालेले नाही तसेच जे खड्डे भरले ते पुन्हा पावसामुळे उखडले आहेत.