उन्हाचा कडाका वाढलेला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यासाठी तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात टँकरने पाणीपुरवठा करणे आणि अन्य उपाययोजनांसाठी ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांचा समावेश केला आहे. जानेवारी ते जून या कालावधीत ३५७ गावांतील ७२२ वाड्यांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना या आराखड्यात सुचवण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचा आराखडा आर्थिक तरतुदीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सचिवांकडे करण्यात आला आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षीप्रमाणे जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एकही टँकरची आवश्यकता भासलेली नाही. पहिल्या टप्यात २०२ गावांतील ३८१ वाड्यांकरिता ७ कोटी ७८ लाख ९० हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
यामध्ये नवीन विंधण विहिरींसाठी ९६ गावांतील १८४ वाड्यांसाठी २ कोटी २० लाख ८० हजार, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी ३९ गावांतील ५९ वाड्यांतील ५९ योजनांसाठी ४ कोटी १३ लाख ५० लक्ष, तात्पुरती पूरक नळपाणी पुरवठा योजनांसाठी ११ गावांतील १९ वाड्यांमधील १९ योजनांकरिता ९८ लाख १० हजार, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २७ गावांतील ६१ वाड्यांसाठी १२ लाख ३० हजार रुपये आवश्यक आहेत. टंचाईवरील उपाययोजनांच्या कामांना ३१ मार्चपर्यंत मंजुरी घेणे आवश्यक आहे. ती मंजुरी मिळाली नाही, तर उर्वरित निधी शासनाकडून मिळत नाही. यंदा टंचाई आराखडा बनवण्यात विलंब झालेला आहे. त्यामुळे या निधीतील उपाययोजनांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू होतो, तसेच दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जून २०२५ या कालावधीकरिता १५५ गावांतील ३४१ वाड्यांसाठी १ कोटी ७० लाख ८० हजार रुपयांचा आराखडा केला आहे. त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १०४ गावांतील २४३ वाड्यांकरिता २२ टँकरना ८० लाख १० हजार रुपये व विहीर खोल करणे, गाळ काढणे या कामांतर्गत ५१ गावांतील ९८ वाड्यांकरिता ९० लाख ७० हजार रुपयांचा आराखड्यात समावेश आहे. जिल्ह्याच्या एकूण आराखड्यात ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, गतवर्षी पावणेसात कोटींचा आराखडा बनवण्यात आला होता. यंदा त्यात सव्वादोन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जलजीवन योजनेतील कामे सुरू असतानाही टंचाईसाठीच्या उपाययोजनांसाठी दरवर्षी अधिकचा आराखडा तयार केला आहे.