रत्नागिरीत सापडलेल्या बनावट नोटांच्या छापखान्यातून संशयिताने ८ लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या ८ लाखांपैकी ४ लाख रुपयांच्या नोटा चिपळूणमध्ये, तर उर्वरित ४ लाखांपैकी काही नोटा लांजा, गुहागरमध्ये वितरित केल्याची चर्चा आहे. पोलिस याचा अधिक तपास करत आहेत. रत्नागिरीतच बनावट नोटांचा छापखाना आढळल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे.
पोलिस याचा अधिक तपास करत आहेत. बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेने रत्नागिरी येथील संशयित प्रसाद राणे याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी लांजा येथील एका व्यापाऱ्याला ५०० रुपयांच्या ५१ नोटा म्हणजे २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली होती. यावरुनच पाचशेच्या बनावट नोटा लांजा येथे चलनात आल्या असल्याचे उघड झाले होते.
रत्नागिरीमध्ये एकूण ८ लाख रुपयांच्या बनावट नोटा छापण्यात आल्या. त्यातील ४ लाखांच्या नोटा चिपळूणमध्ये देण्यात आल्या, उर्वरित ४ लाखांपैकी काही नोटा लांजा तर काही गुहागरमध्ये वितरित केल्याचे समजते. आता पोलिस या नोटा नेमक्या कोणा कोणाला देण्यात आल्या याचा शोध घेत आहेत. १५ ते २० टक्के कमिशन यामध्ये संबंधितांना मिळत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. चिपळूणमध्ये या बनावट नोटांचे प्रकरण उघड झाले.

