मंगळवारी रात्री ८ वा.पासून सलग दीड तास बिगर मोसमी पावसाने संगमेश्वर पट्ट्याला चांगलेच झोडपून काढले. अचानक मेघगर्जना करत आलेल्या या पावसाने शिमगोत्सवाच्या आनंदावर विजरण पडले आहे. विजांचा मोठा लखलखाट पहायला मिळत होता. सुदैवाने रात्रौ उशीरापर्यंत कोणतीही मोठी दुर्घटना झाल्याचे वृत्त नव्हते. मंगळवारी सकाळपासूनच परिसरात हवामान ढगाळ होते. उत्साह वाटेल असे वातावरण नव्हते. वातावरण पाहून अनेक बुजुर्गांनी आज पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता आणि मंगळवारी रात्री ८ वा. च्या सुमारास तो खरा ठरला. तसा सायंकाळी ७ वाजल्यापासूनच पावसाचे वातावरण होते. वाराही वाहत होता. त्यामुळे बाजारपेठेत आलेली मंडळी लवकर काम आटोपून आपल्या घरी परतली.
८ वा. च्या सुमारास मोठ्यांदा गडगडू लागले. विजा चमकू लागल्या आणि धो-धो पावसाला सुरुवात झाली. केवळ संगमेश्वर परिसरच नव्हे तर आसपासच्या अन्य काही गावांमध्येही पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे. पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावर चिखल साचला. सायंकाळी अनेक मंडळी लवकर घरी परतली होती. मात्र तरीही काही मंडळी बाजारपेठेत होती. त्यांची या पावसाने तारांबळ उडविली. यामुळे अनेकांची निराशा झाली. प्रामुख्याने अजनूही अनेक ठिकाणी शिमगोत्सव सुरू आहे. खुद्द संगमेश्वरमध्ये प्रसिद्ध शिंपणे उत्सवाची तयारी सुरू आहे. अनेक गावांमध्ये पालखी नाचविण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले.
८ वा. सुरू झालेला हा पाऊस रात्री ९.३० वा. च्या सुमारास थांबला. मात्र त्यानंतरही काही ठिकाणी जोर कमी झाला असला तरी पाऊस सुरू होता. या पावसामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा सिझन सध्या भरात आहे. अनेक बागायतदारांनी फळ तोंडणी केली असून पेट्या भरण्याचे काम रात्रौ उशीरापर्यंत चालते. अशा या काढलेल्या फळावर काही ठिकाणी पावसाचे पाणी पडल्याने नुकसान झाले आहे. झाडावरील फळही कोसळल्याचे अनेक ठिकाणी दिसते आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली असली तरी या नाशा पावसाने मोठे नुकसान केले असावे, असा अंदाज बांधण्यात येत आहे.