शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना किती निधी दिला? हे ते सांगू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? असा टोला रामदास कदमांनी ठाकरेना लगावला. उद्धव ठाकरेंना आता टीका करण्याचेच काम आहे. ते भविष्यात कधीच सत्तेत येणार नाहीत. केलेल्या कर्माची फळं उध्दव ठाकरेंना भोगावी लागतील असेही कदम म्हणाले. खेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बजेटच्या मुद्यावरुन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. बजेट हे पक्षाचे नसते, उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? असे रामदास कदम म्हणाले. टीका करण्याचा उद्धव ठाकरेंचा धंदा सुरु राहू देत असेही ते म्हणाले. भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचे रामदास कदम म्हणाले. कर्नाटकमध्ये जाऊन मराठी किंवा हिंदी बोलून दाखवा, असही ते म्हणाले. तिथे बोलता येत नसेल तर मुंबईत इतर भाषा का? असा खडा सवाल रामदास कदम यांनी केला.
लाडकी बहिण योजनेबाबत रामदास कदम यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. बजेट डोळ्यासमोर ठेऊन योजना राबवाव्या लागतात. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरु करता येतील असही रामदास कदम म्हणाले. अंथरुण पाहून पाय पसरावे लागतात असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. माजी आमदार संजय कदम यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर रामदास कदम यांची प्रतिक्रिया दिली आहे. संजय कदम यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते पक्षात येणार असतील तर मी पायघड्या घालेन असेही रामदास कदम म्हणाले. कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका ठरल्याची माहिती मिळत आहे.