रत्नागिरी जिल्हयाला भारनियमनापासून सध्या तरी मुक्त करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले आहे. असे असताना देखील कालपासूनच पावस भागामध्ये वीजपुरवठा खंडित होत आहे. आजही वीजपुरवठा दोन तास खंडित करण्यात आला होता. खंडित वीजपुरवठ्यामुळे आंबा, काजू, फणस उत्पादन कॅनिंग व्यवसायिक, फळप्रक्रिया उद्योगवाले धास्तावले असून, पावस भागातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या फळप्रक्रिया उद्योगाला भारनियमनाचा चांगलाच फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.
कालपासून पावस विभागात अचानक भारनियमन सुरू झाल्याने परिसरातील आंबा, काजू, फणस इत्यादीचे उत्पादक तसेच हॉटेल व्यवसायिक, कॅनिंग व्यवसायिक हवालदिल झाले आहेत. नाशिवंत फळांवर प्रक्रिया करण्याची कृती तात्काळ करावी लागते. मात्र वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नाशिवंत माल फुकट जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या भागातील व्यवसाय आणि अर्थकारणावर या भारनियमनाचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे ऐन मोक्याच्या वेळी महावितरणाने भारनियमन करून पावस परिसरातील नागरिकांना सर्व प्रकारे अडचणीत आणले आहे.
भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र तसेच पावस विभागात कोकणात फिरण्यासाठी, आंबा खरेदीसाठी मोठ्या संख्येने पर्यटक आलेले असताना, सुरु करण्यात आलेले भारनियमन खूप अडचणी निर्माण करणारे, पर्यटन व्यवसायावर, हॉटेल, लॉजिंग व्यवसायावर विपरीत परिणाम करणारे आहे. या सर्वाचा विचार करून कोणतेही तांत्रिक कारण पुढे करता वीजपुरवठा अखंड ठेवावा, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले असून जनभावना लक्षात घेऊन भारनियमनाचे धोरण तात्काळ थांबवावे अशी मागणी केली आहे. जेणेकरून ऐन हंगामामध्ये व्यावसायिकांची होणारी अडचण दूर होईल.