एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये नोकर भरतीच्या प्रस्तावास अखेर हिरवा कंदील मिळाला असून राज्यात १७ हजार ४५० पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहे. पुढील महिन्यात २ ऑक्टोबरपासून निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. रत्नागिरी एसटी विभागात ९४० हुन अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त जागेवर चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांची भरती होणार असून रिक्तपदांची माहिती काढण्याचे काम रत्नागिरी विभाग करीत आहे. पदभरतीमध्ये कोकणातील बेरोजगार भूमिपूत्रांना संधी मिळणार असल्यामुळे युवकाकडून तयारी सुरू झाली आहे. पूर्वी एसटीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून एसटीतील नोकर भरतीला २०२४ पर्यंत उच्च न्यायालयाने मनाई केली होती. येत्या काही वर्षात निवृत होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहेत. तसेच विविध ८ हजाराहून अधिक नवीन बसेस राज्यात येणार आहेत. त्यामुळे चालक, वाहकासह अन्य पदे रिक्त होणार आहेत.
याचा विचार करून राज्य महामंडळाने नोकरभरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे दिला होता. अखेर त्याला मंजूरी मिळाली असून राज्यात १७ हजार ४५० जागेसाठी नोकरभरती होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, रत्नागिरी विभागात ९४० पदे रिक्त असून त्यामध्ये चालक वाहकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागाकडून वेळोवेळी रिक्त जागांसंदर्भात प्रस्ताव महामंडळास पाठवला आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्याने पदे भरण्यात येणार आहेत. नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे नव्याने होणाऱ्या भरतीम ळे कोकणातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. भरतीत निवड झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मासिक किमान ३० हजार रूपये वेतन देण्यात येणार असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.

