आंबडवे-लोणंद या महामार्गावर दुरूस्ती करताना तात्पुरती मलमपट्टी केली आहे. गेली सात वर्षे सुरू असलेल्या तालुक्यातील एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. प्राधिकरण व ठेकेदारांकडून दर्जेदार कामाचे आश्वासन दिलेले असतानाही गलथान कारभार सुरूच आहे, असे मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी सांगितले. संघर्ष समितीतर्फे प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यामध्ये रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे तसेच रस्त्याला पडलेले खड्डे, गटार बनवणे, राष्ट्रीय महामार्गापासून अंतर्गत गावातील रस्ते बनवणे अशी काम करण्याची मागणी केली गेली होती.
ही कामे १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. या विषयी मंडणगड तहसीलदारांनी बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, असे आदेश दिले. ठेकेदारांनी कामाला सुरवात केली. त्या कामाची संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या वेळी अंतर्गत आंबवणे खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता.
रस्त्यावरील चिखल काढून मातीची मलमपट्टी करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू होते. गावांमध्ये जाणाऱ्या दोनचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. समितीचे अध्यक्ष यांनी पाहणी करून खडी टाकून रोलिंग करा, असे त्यांना सांगितले. तिथे रोलर फिरणार नाही, असे सांगून कामात टाळाटाळ करत कामगार तिथून निघून गेले. महामार्ग अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्यात आला. कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली होती.