सावंतवाडी शहरामध्ये ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागात ख्रिसमस कॅरल सिंगिंग करून तेथील भागातील रहिवाशांना नाताळ सण व नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यात लहान मुलांसह मोठ्यांनीही सहभाग घेतला आहे.
कोकण, तळकोकणात सर्व धर्मांचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. भागानुसार विविध पद्धतींचा विचार करून तेथील रीतीप्रमाणे सण साजरे करण्यात येतात. ख्रिसमस आणि नव वर्ष काही काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने सर्वांची जय्यद तयारी सुरु आहे. अनेक जण कोकण, सिंधुदुर्ग, गोवा याठिकाणी जाऊन ख्रिसमस आणि नव वर्ष साजरे करण्याचे प्रयोजन करत आहेत. ख्रिसमस सुरु होण्याआधीचा आठवडा देखील विशेष असतो. त्यामध्ये विविध प्रकारे सजावट, घराला रंगरंगोटी, लाइटिंग, विविध केकचे पदार्थ, विविध प्रकारच्या गोड पदार्थांची रेलचेल असते.
शहरातील विविध भागात शनिवारी ख्रिसमसच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला. २५ ला होणार्या ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधव व मंडळानी शुभेच्छा कार्यक्रमांची सुरुवात केली. घरोघरी जाऊन ख्रिसमस कॅरल सिंगिंग केले जाते आहे. यात लहान व मोठ्यांनीही सांताक्लॉजची वेशभूषा करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मुलांना चॉकलेट, खाऊ व भेटवस्तू देण्यात आल्या. मिलाग्रीस शाळेचे प्राचार्य रिचर्ड सालदाना, या भागातील फाब्रिककार मायकल डिसोजा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
गोवा हे प्रेक्षणीय स्थळ देखील काही तासांवरच असल्याने, ख्रिसमसची मज्जा लुटण्यासाठी मित्र मैत्रिणींचे ग्रुप, तर काही कुटुंबासोबत आनंद घेण्यासाठी गोव्यात दाखल होतात. गोव्यामध्ये सर्व चर्चमध्ये विशेष प्रकारची सजावट करून लोकांना आकर्षित केले जाते.