फेंगल वादळामुळे गायब झालेल्या थंडीचा जोर पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात वाढू लागला आहे. सोमवारी (ता. ९) दापोलीत किमान तापमान ११.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. दहा दिवसानंतर पारा कमी झाला. पुन्हा २४ तासांत पारा १३.४ अंशावर पोहोचला आहे; परंतु दापोलीसह जिल्ह्यात थंडीचा जोर कायम आहे. थंड वातावरणामुळे आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला असून, पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल झाला. ३० नोव्हेंबरपर्यंत किमान तापमान ८.८ अंशपर्यंत खाली आले होते. १ डिसेंबरपासून उष्णता वाढली. मागील आठवड्यात दापोलीतील थंडीचा जोर कमी झाला होता. वातावरणात उष्मा जाणवत होता. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली होती. कालपासून किमान तापमानात घट व्हायला सुरुवात झाली आहे. काल (ता. ८) किमान तापमान १४ अंश इतके नोंदले गेले होते.
अवघ्या २४ तासांत पारा आणखी खाली घसरला असून आज ११.९ अंश इतकी नोंद झाली आहे. तापमान पुन्हा घसरू लागल्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात उतरलेल्या शाली आणि स्वेटर पुन्हा एकदा दापोलीतील नागरिकांच्या अंगावर दिसू लागले आहेत. हवेत दिवसभर गारवा जाणवत होता; मात्र वातावरणातील या बदलामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या झाडांना चांगलाच मोहोर आला होता तर काही झाडांना थोड्याच दिवसात येण्याची चिन्हे होती. वातावरणाचा खेळखंडोबा सुरू राहिला तर आंबा-काजू पिकांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.