खेड रत्नागिरी येथील जगबुडी नदीमध्ये अनेकदा बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. पाण्याचा त्याचप्रमाणे भरती ओहोटीचा अंदाज नसल्याने अनेक जण पाण्यात उतरतात आणि खोल पाण्यात गटांगळ्या खातात. काही जण तर वाहने धुवण्यासाठी जगबुडीच्या पात्रात वाहने उतरवतात. त्यामुळे काही वेळा वाहने देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून जातात. असाच प्रसंग काल घडला.
जगबुडी नदीला आलेल्या भरतीच्या पाण्यामध्ये शहरालगत नदीपात्रात उतरलेला एक मालवाहू टेम्पो बुडाला. तर चालक मात्र प्रसंगावधान राखत नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर पडला. खेड शहराला लागून असलेल्या मच्छी मार्केटसमोर उथळ नदी पत्रात चालकाने टेम्पो उतरवला. त्यावेळी नदीच्या पात्रात भरतीचे पाणी चढू लागल्याने चालकाने टेम्पो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु टेम्पोचे चाकच रुतल्याने टेम्पो पाण्यामध्ये बुडू लागला. अचानक घडलेल्या प्रकरामुळे चालक देखील घाबरला, पण प्रसंगावधान राखून नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर पडला. काही वेळातच भरतीचे पाणी इतके वाढले की, टेम्पो अर्ध्याहून अधिक भरतीच्या पाण्याखाली बुडाला. संध्याकाळी उशीरापर्यंत हा टेम्पो काढण्यासाठी स्थानिक नागरिकांचे प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, या ठिकाणी नदीचे पात्र उथळ असल्यामुळे अनेक वाहनचालक या ठिकाणी आपल्या गाड्या धुण्यासाठी जातात. अनेक वेळा भरती आणि ओहोटीच्या वेळा आणि अंदाज न आल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. मागील तीन-चार वर्षामध्ये घडलेली ही चौथी घटना आहे, असे तेथील स्थानिक मच्छि मार्केट परिसरातील व्यावसायिकांनी सांगितले आहे. अनेकदा सांगून देखील काही चालक मनमानी कारभार करताना दिसतात आणि मग असा बाका प्रसंग उद्भवतो. चालकाने वेळीच आपला बचाव केल्याने, त्याचे प्राण वाचले.