सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजपला शह देण्यासाठी नवी राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी या दोन पक्षांच्या नुकतीच एक गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. खा. नारायण राणे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील’ राजकीय ताणतणाव सर्वांनाच ठाऊक आहेत. मात्र सिंधुदुर्गातील आणि त्यातही विशेषतः कणकवलीतील स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. शहर विकास आघाडीची स्थापना करून दोन्ही गट एकत्र येत कणकवली नगर पंचायतीची निवडणूक लढणार असून या शहर विकास आघाडीला अन्य काही स्थानिक सामाजिक आणि राजकीय संघटनादेखील पाठींबा देतील अशा हालचाली सुरू आहेत.
कणकवलीत गुप्त बैठक ? – स्थानिक पातळीवर या हालचाली सुरू असून यासंदर्भात कणकवली शहरामध्ये या दोन पक्षांच्या काही नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येते आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक, तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतून नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले विधान परिषदेचे माजी आमदार राजन तेली, स्थानिक नेते सुशांत नाईक, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर, सतीश सावंत आदी नेते मंडळी उपस्थित होती अशी चर्चा सुरू आहे. कणकवली नगर पंचायतीच्या निवडणुकीबाबत या बैठकीत रणनिती आखण्यात आली. दोन्ही गटातील नेत्यांनी आपआपसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवल्याचे कळते.
संदेश पारकर उमेदवार? – शहर विकास आघाडीची स्थापना करून नगर पंचायत निवडूक लढविली जाईल. संदेश पारकर हे या आघाडीचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असतील. येत्या २ दिवसात याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या नव्या आघाडीची जोरदार चर्चा सध्या स्थानिक राजकारणात सुरू आहे.
भाजप आणि राणेंना शह – हे’ एकत्रिकरण भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे सेनेचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी खा. नारायण राणे यांना शह देण्यासाठी होते आहे, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे. राणे यांचे कट्टर समर्थक समीर नलावडे हे भाजपचे उमेदवार असतील असे मानले जाते. तर शहर विकास आघाडीच्यावतीने संदेश पारकर यांना त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे खा. नारायण राणे यांचे मोठे चिरंजीव निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. अशावेळी शिंदे गटाचे काही नेते ठाकरे गटाशी एकत्र येण्याच्या हालचाली करत असल्याने हे खरच एकत्र आले तर तो कोकणच्या राजकारणातील सर्वात मोठा भुकंप ठरेल असा होरा राजकीय निरिक्षक वर्तवत आहेत. शेवटी याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल असे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.
कणकवली शहरासाठी हा शहर विकास आघाडीचा प्रस्ताव असून तो केवळ शिवसेनेचा नाही. या आघाडीम ध्ये केवळ ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना हे दोनच पक्ष नसतील तर इतर समाजसेवी संघटनादेखील असणार आहेत. शहरासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आणि संघटनादेखील या आघाडीत सहभागी होतील. विकासासाठी एकत्र येण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणून हा मंच स्थापन करण्याच्या हालचाली आहेत. मात्र हा प्रस्ताव मंजूर करायचा की नाही याचा अंतिम निर्णय हा वरिष्ठांचा असेल आणि ते जो निर्णय घेतील तो आम्ही शेवटी मान्य करू असे माजी आमदार राजन तेली यांनी याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

