मशालीच्या रूपातील बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अस्तित्वाला या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने धक्का बसला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर भाजपचा तर रायगड- रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे लोकसभेतील ठाकरेंच्या वर्चस्वाला धक्का बसला असून, भविष्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकींत बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे टिकून राहण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर गेली ३३ वर्षे कोकणात एकहाती वर्चस्व निर्माण झाले होते.
कोकण आणि मुंबईचे वेगळेच नाते असल्यामुळे येथे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला वेगळीच किनार लाभलेली आहे. मागील दीड वर्षांत घडलेल्या घडामोडींमुळे शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली. त्यांच्या बाजूने ४० आमदार गेले. कोकणातील दोन आमदारांनी त्यांची साथ धरली. त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या महायुतीत सहभागी झालेल्या शिंदे शिवसेनेला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातील उमेदवारासाठी एकही जागा मिळवता आली नाही. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच कोकणातील दोन्ही जागांवर शिवसेनेचा उमेदवार उभा नव्हता.
मशालीच्या निमित्ताने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, तर रायगडमधून अनंत गिते रिंगणात उतरले. त्यामुळे धनुष्यबाण नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार झालेल्या पक्षाचा उमेदवार असल्यामुळे सहानुभूतीचा फायदा होईल, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर दोन्ही जागांवर मशालीला अपयश आले. त्यामुळे लोकसभेत कोकणातील शिवसेनेच्या नेतृत्वाला धक्का बसला असून, भविष्यातही शिंदे शिवसेना असो किंवा ठाकरे सेना दोघांनाही आपले वर्चस्व टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.