बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणावर सुरू असलेल्या राजकारणावर आता राजापुरातून देखील मोठा उठाव होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीने रविवारी (ता. १०) सकाळी १०.३० वा. राजापूर नगरवाचनालय सभागृहात कार्यकारिणी आणि प्रमुख सक्रिय कार्यकत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. बैठकीला कार्यकारिणी सदस्य तसेच सक्रिय जागरूक बांधवांसह विविध राजकीय पक्षांतील ओबीसी सेलच्या अध्यक्षांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे.
ओबीसी समाजातून जागृतीची मोहीम सुरू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाचे ओबीसी सेल अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. या विविध राजकीय पक्षांच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षांनाही या बैठकीला खासकरून निमंत्रित करण्यात येणार आहे. या राजकीय पक्षांच्या सेलच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी पूरक आहे की त्यांच्या त्यांच्या राजकीय पक्षाच्या उद्धारासाठी समर्पक आहे, याची खातरजमा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे राजापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, १० डिसेंबरला होणाऱ्या राजापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या बैठकीनंतर लागलीच जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी पदाधिकाऱ्यांचे ग्रामीण भागाचे दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाला गृहित धरून आपले राजकारण वर्षानुवर्षे रेटल्याने भविष्यात लांजा-राजापूर तसेच रत्नागिरी मतदार संघात ओबीसी संघटन मजबूत करून प्रतिनिधित्वासाठी लढाई हाती घेण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.