मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेली अडीच वर्षे उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्रालय सांभाळत होते. आता शिंदे यांना उपमुख्यमंत्री मिळाले आहे. मग गृहमंत्रालय द्यायला भाजप का टाळाटाळ करतेय, असा सवाल मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असतानाच शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पंवार दिल्लीला रवाना झाले असून एकनाथ शिंदेंनी मात्र दिल्लीला जाणे टाळले आहे. त्यामुळे विस्ताराचा पेच अद्यापही कायम आहे. दरम्यान अमित शहांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती दौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत.
पेच कायम – शपथविधी होवून आठवडा उलटून गेला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. महायुती खातेवाटपावरून वाद असून त्यावर तोडगा काढण्यासाठीच ही दिल्लीवारी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. शिवसेना अजूनही गृह खात्यासाठी आग्रही आहे. मात्र भाजप हे खाते सोडण्यास तयार नाही. महसूल खातेही भाजप शिवसेनेला देण्यास तयार नाही. भाजपने तडजोडीचा प्रस्ताव म्हणून नगरविकास खाते देवू केले आहे. मात्र शिंदे अजूनही गृहखाते हवे असा हट्ट धरून आहेत. त्यामुळे याबाबतचा अंतिम तोडगा अमित शहांच्या दरबारात सोडविण्यासाठी फडणवीस दिल्लीत गेल्याची चर्चा आहे.
बावनकुळेंची चर्चा – खातेवाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या रात्री उशिरा भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. भाजपने शिवसेनेला बारा खाती देवू केली आहेत. त्यावर चर्चा झाली. चर्चेच्याशेवटी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोनवरून बोलणे करूनही दिले. गृहमंत्री पद वगळता अन्य सर्व विषयांवर एकमत झाल्याचे बोलले जाते. मात्र गृहमंत्रीपदाचा तिढा अमित शहांच्या दरबारी सुटणार आहे. शिंदेंच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोघांना पुन्हा मंत्रीपद देण्यास फडणवीसांनी नकार दिला असून त्याबाबतचा अंतिम निर्णय शिंदेंना घ्यायचा आहे. त्याबाबतही अमित शहा मध्यस्थी करतील असा अंदाज आहे.
राष्ट्रवादीला ९ मंत्रीपदे – ललशिंदेंप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचीही फडणवीसाशी चर्चा झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या ९ मंत्रीपदे देण्यात येणार असल्याचे कळते. अर्थखाते अजितदादांकडेच राहील. अजितदादांनी शिवसेनेप्रमाणेच बारा मंत्रीपदे मिळावीत अशी मागणी केली आहे. त्याबाबतचा निर्णय बुधवारी रात्री उशीरा दिल्लीत अमित शहांसोबत होणाऱ्या बैठकीत केला जाईल असे बोलले जाते.
भाजपला २१ ते २२ मंत्रीपदे – १३२ जागा जिंकणाऱ्या भाजपला ४३ मंत्र्यांपैकी २१ ते २२ मंत्रीपदे मि ळू शकतात. शिंदेंना १० ते १२ आणि अजितदादांना ९ ते १० मंत्रीषदे असा ढोबळमानाने फॉर्म्युला ठरला आहे. भाजपच्या यादीमध्ये काही धक्कादायक नावे असू शकतात.
भाजपचे संभाव्य मंत्री – राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, मंगलप्रभात लोढा, देवयानी फरांदे, बबनराव लोणीकर, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, माधुरी मिसाळ, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे.