आभाळ फाटल्यागत कोसळणाऱ्या पावसाने पुराची परिस्थिती ओढवून तालुक्यातील पोसरे बौद्धवाडीवर काळाचा घाला पडला. डोंगराचा काही भाग ७ घरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा हकनाक बळी गेला. या दुर्घटनेला तब्बल २ वर्षांचा कालावधी लोटून देखील अद्याप येथील दरडग्रस्त ग्रामस्थांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यांच्या डोक्यावर छप्परच प्रशासनाने उपलब्ध न केल्याने त्यांच्यावर निर्वासित होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. २३ जुलै २०२१ ला खेड तालुक्यात मुसळधार झालेल्या पावसाने पोसरे बौद्धवाडी येथे रात्रीच्या सुमारास ७ घरांवर डोंगराचा भाग कोसळल्याने डोंगराच्या दरडीखाली तब्बल सात घरे गाडली गेली होती. त्यामध्ये १७ जणांचा दुर्दैवीरित्या बळी गेला. या घटनेनंतर मदतकार्यात देखील उशीर झाल्याने सुमारे चार दिवस दरडीखाली अडकलेल्या ग्रामस्थांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. अखेर सहा दिवसांनी मदतकार्य थांबून १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या घटनेला २३ जुलै २०२३ ला दोन वर्षे पूर्ण होतील; मात्र आज त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला गेलेला नाही. येथील दरडग्रस्त आपल्या हक्काच्या घरात नाहीत. सुरवातीला पुनर्वसन करू, असे आश्वासन दिले होते; मात्र सद्यःस्थितीत जमीन द्या, आम्ही घर बांधून देतो, असे प्रशासनाने येथील ग्रामस्थांना सांगण्यात आल्याने दरडग्रस्त ग्रामस्थांची प्रशासनाने क्रूर चेष्टाच केली आहे. याबाबत खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्यावतीने प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आला; मात्र पाहिजे तशी प्रशासनाकडून दखल घेतलेली दिसत नाही. दुर्घटनेनंतर पोसरे ग्रामस्थासाठी मदतीचा ओघ सुरू झाला होता; मात्र आता येथील ग्रामस्थ घरांसाठी लढा देण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. या दुर्घटनेनंतर पीडित ग्रामस्थांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र हे आश्वासन सध्या हवेतच विरून गेले आहे.