मागील दोन दिवसांपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण मुंबई-गोवा महामागांच्या पाहणीकरिता रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर ते लांजा येथे आले असता त्यांनी अधिकार्यांसोबत शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजन साळवी, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, नगराध्यक्ष मनोहर बाईत, लांजा तालुकाध्यक्ष महेश खामकर, यांच्यासह लांजा शहरातील व्यापारी, भाजपचे पदाधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग तयार करताना स्थानिक अनेकांच्या जमिनी रस्त्याच्या कामासाठी मोबदला देऊन शासनाने विकत घेतल्या होत्या. परंतु, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये अनेक स्थानिकांनी दिलेल्या माहितीमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अनेक स्थानिकांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गासाठी गेल्या असून, त्या बाधितांना अद्याप मोबदला का मिळालेला नाही. या लांजा व्यापारी संघटनेच्या प्रश्नावर थातुरमातुर उत्तर देणार्या लांजा राजापूर प्रांताधिकार्यांना थेट आपल्या कार्यालयात काही दिल्याशिवाय मोबदला दिला जात नाही, असा थेट आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी लांजा येथे अधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये केला.
इतके वर्ष रेंगाळलेले महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. यावेळी उपस्थित व्यापारी आणि तालुक्यातील काही पदाधिकार्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच कोणताही वादविवाद नसतानाही अद्याप ८६० लोकांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, अशी तक्रार करण्यात आली. यावेळी मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी गणपती उत्सव संपण्यापूर्वी जमीन मालकांचा मोबदला देण्याचे निर्देश दिले आहेत.