रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेने ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतून १४ हजारांपेक्षा अधिक विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. अशा प्रवाशांकडून कोकण रेल्वेने तीन महिन्यांच्या कालावधीत ८६ लाख ६७ हजार ८२० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यांसाठी अधिक तीव्र करणार आहे. अभिमानाने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा, तिकीट खरेदी करा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये सातत्याने तिकीट तपासणी करून विनातिकीट प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांवर कारवाई केली जात असते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन केले असताना, दिवाळी सुटीत रेल्वे प्रशासनाने राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत विनातिकीट करणारे मोठ्या प्रमाणावर प्रवासी दिसून आले. अशांवर कारवाई करत रेल्वे प्रशासनाने लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या गेल्या तीन महिन्यांत करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत १४ हजार १५० विनातिकीट प्रवासी आढळून आले.
त्यांच्याकडून ८६ लाख ६७ हजार ८२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑगस्ट २०२३ मध्ये ४ हजार ४८४ विनातिकीट प्रवाशांकडून २६ लाख ६७ हजार ५५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सप्टेंबरमध्ये ४ हजार ८८८ विनातिकीट प्रवाशांकडून २७ लाख ९ हजार ७०० रुपयांचा दंड तर ऑक्टोबरमध्ये ४ हजार ७७८ विनातिकीट प्रवाशांकडून ३२ लाख ६० हजार ५६५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, यापुढे ही तिकीट तपासणीची मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर सुरू राहणार आहे. प्रवाशांनी योग्य व वैध तिकिटासह प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
विनातिकीट प्रवासाची अशीही कारणे – दिवाळीत शाळा, महाविद्यालयांना दीर्घ सुटी असल्यामुळे चाकरमान्यांसह पर्यटक कोकणात दाखल झाले होते. त्यामुळे कोकण मार्गावरील रेल्वेफेऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. एक महिना आधीच मुंबईकडे जाणाऱ्या तसेच रत्नागिरीकडे येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल होते. कोकण मार्गावरील सर्वच गाड्यांचे तिकीट मिळणे अवघड झाले होते. तिकीट न मिळाल्याने काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत आहेत. ऑनलाईन काढलेले तिकीट आरक्षण यादीत आले नाही तर ते रद्द होते. अशावेळी विनातिकीट जाणारेही अधिक आहेत.