फयान वादळातील अतिवृष्टीत राजापूर तालुक्यातील शिवणेबुद्रुक-वडदहसोळ येथील रस्ता सुमारे २५ फूट खचला होता. त्या रस्त्याला मोठमोठ्या भेगाही पडल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी करत रस्ता सुस्थितीत केला; मात्र गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने सोळा वर्षांपूर्वीचे दुखणे पुन्हा वर आले आहे. शिवणेबुद्रुक-वडदहसोळ येथील रस्ता खचला असून, भेगाही पडल्या आहेत. पुढील दोन महिन्यात अतिपावसामुळे हा रस्ता आणखी खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. फयान वादळ ३० सप्टेंबर, २००९ मध्ये झाले. त्या वेळी शिवणेबुद्रुक वडदहसोळ येथील रस्ता सुमारे २५ फूट खोल खचला होता. त्यामुळे शिवणेबुद्रुक, वडदहसोळ गावांशी संपर्क साधण्याच्यादृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा आहे; मात्र तो खचल्याने त्या परिसरातील गावांशी संपर्क त्या वेळी तुटलेला होता. त्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. पुढे त्या रस्त्याची जमीन वारंवार खचत होती. काही ठिकाणी भेगाही पडत होत्या.
त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलमपट्टी करण्यात आली. पाण्याचा निचरा होईल, अशा उपाययोजनाही तिथे केल्या गेल्या. त्यानंतर वाहतूक सुरळीत होती; परंतु मे आणि जून या दोन महिन्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे १६ वर्षानंतर पुन्हा वडदहसोळ-शिवणेबुद्रकचा रस्ता खचला आहे. दरम्यान, हा रस्ता वारंवार का खचतोय? याची कारणमिमांसा करणे आवश्यक आहे. खचलेल्या या रस्त्याच्या उजव्या बाजूने वहाळ आहे. त्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्याचा फटका या रस्त्याला बसत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे याबाबत भौगोलिकदृष्ट्या संशोधन वा अभ्यास होणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचा अधिक राबता – ओणीपासून सुमारे दहा-पंधरा किमी अंतरावर शिवणेबुद्रुक, वडदहसोळ आणि अन्य काही गावे वसलेली आहेत. वैद्यकीय सुविधा, शासकीय कामे यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना ओणी भागात सतत यावे लागते. शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही याच भागात यावे लागते. त्यासाठी शिवणेबुद्रुक-ओणी हा खचणारा रस्ता एकमेव महत्त्वाचा रस्ता आहे. तोच रस्ता आगामी काळात बंद झाल्यास या पंचक्रोशीतील गावांचा ओणीसह अन्य गावांशी संपर्क तुटणार आहे. ज्या भागात रस्ता खचला आहे त्या भागात शेती असल्याने तिथे ग्रामस्थांचा सतत वावर असतो. भविष्यात मोठ्या भेगा पडल्या तर शेतकरीवर्गाची अडचण होणार आहे.
वहाळाकडील बाजूस उभारली संरक्षक भिंत – खचलेल्या रस्त्याची सर्वप्रथम डागडुजी बारा वर्षांपूर्वी केली गेली. त्यानंतर अतिवृष्टीत भेगा रुंदावत गेल्या. त्यामुळे २०१३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागात पाण्याचा योग्य निचरा कसा होईल, याकडे विशेष लक्ष दिले. त्यासाठी रस्त्याच्या बाजूने गटारांचे नियोजन केले. तसेच वहाळाकडील बाजूला संरक्षक भिंतही बांधण्यात आली होती.