कोरोना काळामध्ये केवळ लसीकरणाचा वेग वाढवल्याने महाभयंकर स्थिती आटोक्यात येण्यास सहाय्य झाले आहे. त्यामुळे वयोगट आणि उपलब्धतेनुसार, लसीकरणाचा टप्प एक एक करून वाढविण्यात आला. ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी बुस्टर डोसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला फ्रंटलाईन कर्मचार्यांना आणि नंतर जनतेसाठी बुस्टर डोस सुरु ठेवण्यात आला आहे. राहिला प्रश्न शाळेमधील मुलांचा तर त्यांच्यासाठी आजपासून १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिलेल्या माहिती नुसार, कोविड लसीकरणाचा वयोगटानुसार आठवा टप्पा सुरू करण्यात येत आहे. या टप्प्यात १२ ते १४ वयोगटातील शाळकरी मुलांचे लसीकरण केले जाईल. आरोग्य विभागाकडून १२ ते १४ वयोगटांतील म्हणजेच अंदाजे सहावी ते आठवीत शिकणाऱ्या मुलांसाठी २१ मार्चपासून कोविड लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ७० हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना ही लस देणार आहे, अशी माहिती दिली. आत्तापर्यंतच्या सात टप्प्यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनची लस वापरली आहे.
आता मुलांसाठी मात्र कोरबेवॅक्स लस उपलब्ध करण्यात आली आहे. या लशीच्या एका डोस व्हायलमध्ये एकूण २० डोस आहेत. एका इंजेक्शनमधून ०.५ मिली इतका डोस देण्यात येतो. कोव्हॅक्सिन प्रमाणेच कोरबेवॅक्स लशीचे दोन डोसमधील अंतर चार आठवडे राहील. १५ मार्च २००८ ते १५ मार्च २०१० या कालावधीमध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना ही लस घेता येऊ शकणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्ह्यात , प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ही लस देऊन या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे.