आंबा घाट बंद असल्यापासून, अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता म्हणून राजापूर तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा घाटरस्त्याचा वापर सुरु करण्यात आला आहे. परंतु त्या रस्त्याची सुद्धा अवस्था एवढी खराब झाली आहे कि, त्यावरून वाहतूक करणे सुद्धा कठीण बनले आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीच्या निधीबाबत राज्यातील महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या परस्परविरोधी विधानांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीप्रमाणे, अतिवृष्टी आणि अवजड वाहनांच्या अति वर्दळीमुळे, रस्त्यात खड्डे पडून चाळण झालेल्या ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सात कोटी ४४ लाख रूपये निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.
पण शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन, या रस्त्यासाठी शासनाकडून असा कोणताही निधी मंजूर झाला नसल्याची माहिती दिली आहे. या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सध्या चालू आहे. रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. गेल्या जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि आंबा घाट बंद असल्याने अणुस्कुरा घाटमार्गे वाढलेल्या वाहतुकीमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
ओणी, पांगरी, अणूस्कुरा, सौंदळ, रायपाटण, पाचल, खडीकोळवण, येळवण, कारवली या राज्य मार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दुर्दशेबाबत लोकांमधून तीव्र संताप व्यक्त करताना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना चांगलेच लक्ष्य केले जात आहे.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय पवार, विभागप्रमुख संतोष हातणकर आदी उपस्थित होते. ओणी-अणुस्कुरा-पाचल रस्त्यातील खड्डे बुजविणे आणि त्याचे नूतनीकरण करण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. त्याप्रमाणे त्यांनी ७ कोटी ४५ लाख रुपये निधीचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे. मात्र, त्याला अद्यापही निधी मंजूर झाला नसल्याचे साळवी यांनी सांगितले. विधानसभेच्या आमदारांची मुंबईत लवकरच कार्यशाळा असून त्यावेळी बांधकाम मंत्री चव्हाण यांची या रस्त्याच्या निधी मंजूरीसाठी भेट घेणार असल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले.