रत्नागिरी शहर पोलिसांना गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. तब्बल १ लाख ४२ हजार रुपये किमतीचा आठ किलो वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला असून या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी रेल्वे फाटा येथे नाकाबंदी करून त्या ठिकाणाहून एसटीमार्गे प्रवास करून गांजा हा अंमली पदार्थ घेउन जाणार्या तीन संशयितांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रत्नागिरीतील भाडे परिसरात राहणारा रुहान होडेकर नामक तरुणाला गांजाची विक्री करताना शहर पोलिसांनी रंगेहात पकडले होते आणि त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश करण्याचा मास्टर प्लान तयार केला. रुहान याला अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी गांजा पुरवठा ज्या वाहनातून होत आहे त्याबाबत माहिती काढली आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नाका-बंदी सुरू केली.
कोल्हापूर-रत्नागिरी या एसटी बस मधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रेल्वे स्टेशन फाट्यानजीक नाकाबंदी लावली, पहाटेच्या सुमारास बस त्या ठिकाणी आली पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. ही बस रेल्वे स्टेशन फाट्यानजीक थांबल्यानंतर पोलिसांनी बसची झडती घेतली त्यावेळी बस मध्ये अक्षय चंद्रकांत जिडगे या संशयित तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
अक्षय चंद्रकांत जिडगे, विनोद आसाराम कार्ले दोघेही हातकणंगले जि.कोल्हापूर येथील राहणारे असून रुहान रियाज होडेकरला भाट्ये, रत्नागिरी येथून आधीच अटक करण्यात आली. गांजा विरुद्ध केलेल्या कारवाई प्रकरणी शहर पोलिसांनी यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा कलम ८ (क) २०(ब) (ब),२९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.