काल दिनांक १२-१०-२०२१ रोजी दुपारी १ वाजता जि.प. रत्नागिरी येथे दूरदृश्य प्रणालीव्दारे रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. श्री. विक्रांत जाधव अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळयाला प्रास्ताविक मांडताना म्हटले की, कोविडच्या काळात आपण जवळची माणसं गमावली. परंतु कोविडच्या निमित्ताने वाईटातून नेहमी चांगल कस होतं हे आपण शिकल्याने , स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची योग्य तितकी काळजी घेणे आपणाला भाग पाडले.
आजच्या ३८ रुग्णवाहिका व पहिल्या टप्यातील २६ रुग्णवाहिका अशा जिल्ह्याला एकूण ६४ रुग्णवाहिका शासनाकडून मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिका मोठ्या असल्यामुळे त्यावर होणारा खर्चदेखील अधिक असून, तो खर्च भागवण्यासाठी शासनाकडून योग्य त्या वेळी निधी मिळावा.
जिल्हयाला रुग्णवाहिका देऊन, आरोग्य यंत्रणेला मजबुती दिल्याबददल शासनाचे आभार मानत प्रास्ताविक सदर केले. खास. श्री. विनायक राऊत यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्हा डोंगर व दऱ्यानी बनलेला असून, अगदी कानाकोपर्यामध्येही जिल्हयाला रुग्णवाहिकांची असलेली गरज आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज पूर्ण होत आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानून सर्वांना धन्यवाद देतो.
ना. श्री. राजेश टोपे मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील रिक्त वैदयकीय अधिकाऱ्यांच्या जागा प्राधान्याने भरल्या जातील अशी ग्वाही दिली. रत्नागिरी जिल्ह्याने कोविड लसीकरणाचे काम फार चांगल्याप्रकारे केलेले आहे. कोविड लसीकरणाचे काम मोठ्या गतीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
नाम. उदय सामंत मंत्री उच्च व तंत्र शिक्षण तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांनी रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हामध्ये कोविडच्या चाचण्या या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी प्रमाणात घेतल्या जात असून, त्या वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपण कोरोनाला थांबवू शकणार आहोत. रुग्णवाहिकांच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळयाचे उद्घाटन मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नाम. उदय सामंत यांनी फित कापून व श्रीफळ वाढवून केले.