महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दोन्ही लाटेमध्ये परिस्थितीत अतिशय भयावह होती. अनेक ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर बेड, आयसीयू बेड यांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवू लागली होती. कोविडची महामारी सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच कोविड परिस्थितीवर लोकसभेत चर्चा होत आहे. विषयाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर विचारणा करत घणाघाती आरोप केला आहे कि, महाराष्ट्राला एकूण पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी ६० टक्के व्हेंटिलेटर हे काहीच उपयुक्त नसून खराब होते.
महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात कोविडची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना पीएम केअर अंतर्गत अनेक राज्यांना मागणीनुसार काही प्रमाणात व्हेंटिलेटरचे वाटप करण्यात आले होते. पण महाराष्ट्रात जे हजारो व्हेंटिलेटर पुरवण्यात आले होते, त्यापैकी ६० टक्के व्हेंटिलेटर कामच करत नव्हते, त्यामुळे त्याचा काहीही उपयोग झालेला नाही असा थेट आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. आणि संसदेत याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.
भारतातील भयानक दुसऱ्या कोविडच्या लाटेमध्ये, भारतातील अनेक लोकांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर बेडची अनुपलब्धता यामुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र, केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेत भारतात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे कधीही मान्य केले नाही.
खास. विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मुंबई आणि महाराष्ट्राने ज्या प्रकारे कोविड परिस्थितीवर नियंत्रण आणले आहे, त्याचे जगाने कौतुकच केले आहे. धारावी पॅटर्नची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल देखील घेण्यात आली, आणि आता मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे त्यांनी सांगितले.