रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रथमच शहराच्या मध्यवर्ती भाग म्हणजेच मारुती मंदिर पासून ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारी काढण्यात आली. पहिल्याच वर्षी या पायी वारीला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. सुमारे तीन हजार वारकऱ्यांनी केलेल्या विठुरायाच्या गजराने अख्खी रत्नागिरी दुमदुमली. पांढरी टोपी, पांढरा झब्बा- लेंगा आणि हातात टाळ व मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत अनेक वारकऱ्यांनी फुगड्या घातल्या, गोल रिंगणही केले. सतत मागील चार-पाच दिवस पडणाऱ्या पावसाने देखील कालचा काही वेळ विश्रांती घेतल्याने वारकऱ्यांचा उत्साह अजूनच वाढला.
प्रत्येकाचे स्वप्न असते कि, आयुष्यात एकदा तरी पंढरपूर वारी पायी करावी परंतु, इच्छा असून देखील पंढरपूरला वारीला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदा प्रथमच रत्नागिरीमध्ये या वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल मंदीर देवस्थान समिती यांच्यासमवेत हनुमान मंदीर, शिवप्रतिष्ठान हिंदस्थान, हिंदू जनजागृती समिती, , राष्ट्रीय स्यंसेवक संघ, राष्ट्रीय सेवा समिती, सनातन संस्था, बजरंग दलहिंदू राष्ट्र सेना, जनजागृती संघ यांच्या पुढाकाराने वारीचे चोख नियोजनबद्ध आखणी करण्यात आली. या करिता चार बैठकाही झाल्या. लायन्स क्लब, रोटरी क्लब, शिवरूद्र ढोल पथक, विविध भजनी मंडळे, इस्कॉन, भंडारी समाज इतर सर्व ज्ञाती संस्था, महिला मंडळ, वकील संघटना, व्यापारी संघटना यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध रूपातील मदत केली.
सकाळी ७ च्या सुमारास मारुती मंदिर येथून टाळ मृदुंगाच्या साथीने आणि मुखाने विठुनामाचा गजर करत, भजने म्हणत वारी निघाली. पाऊस असला तरीही वारीत सहभागी होण्याचा मानस अनेकांनी बोलून दाखवला. परंतु आज पावसानेच विश्रांती घेतली. पहिले वारकरी माळनाका येथील स्काय वॉकजवळ असताना शेवटचा वारकरी मारुती मंदिरपाशी होता. एवढ्या विराट संख्येने वारकरी यात सहभागी झाले होते. वारी हळुहळू जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका मार्गे विठ्ठल मंदिरात पोहोचली. येथे सुद्धा वारीचे स्वागत विठ्ठल मंदिर देवस्थानने केले. सर्व वारकऱ्यांनी रांगेत उभे राहून विठुरायाचे दर्शन घेतले.