हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे कोकणसह शेजारील राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची खेळी सुरु आहे. मागील आठवड्यापासून संपूर्ण राज्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढतच चालला असल्याने अनेक ठिकाणी धरणे, धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी नागरिकांची एक प्रकारे लगबग पहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आंबोलीत काल रविवार सुट्टीच्या दिवशी वर्षा सहलीला अनेक गट आल्याने हाऊसफुल झाले होते. मुसळधार पावासात देखील अनेक हौशी पर्यटकांनी येथे प्रचंड गर्दी केली होती. हजारो पर्यटक आंबोली वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सहकुटुंब, मित्र मैत्रिणींसह दाखल झाले होते. मात्र एवढे पर्यटक दाखल झाल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले. सिंधुदुर्ग पोलिसांच्या कमतरतेमुळे आंबोलीत तब्बल तीन ते चार तासांची वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पाण्याच्या ठिकाणी काही वेळा पर्यटकांच्या अतिरेकामुळे दुर्घटना घडतात. त्यामुळे कायम अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. परंतु, अंबोलीची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलिस प्रशासनाने केवळ १० पोलिस आंबोलीत पाठवले होते. त्यातच आंबोली धबधब्याच्या ठिकाणी तरुणांच्या हुल्लड बाजीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला हे पर्यटक रस्त्यातचं हुल्लड बाजी करत होते, त्यामुळे ट्राफिकची समस्या उद्भवली आहे.
दरम्यान, अतिरिक्त पोलीस दाखल झाल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करून, पोलिसांनी तात्काळ मार्ग काढत वाहनांची गर्दी कमी केली. तरीही आंबोलीतील धबधबा प्रेक्षणीय असल्याने रोज पर्यटकांचा ओघ वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे.