ऑनलाईन फसवणूकीच्या घटना हल्ली वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहेत. कोरोना काळापासून सर्वच जण कोणत्याही खरेदीच्या पेमेंटसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करताना दिसून येतात. त्यामुळे अनकेदा काही फसवणूक करणाऱ्या माणसांमुळे आर्थिक फटका बसण्याचा संभव निर्माण होतो.
लांजा येथील तरुणाने मोबाईलसाठी घेतलेल्या ऑनलाईन कर्जासाठी जादा पैसे भरण्यास नकार दिल्याकारणाने तरुणाचा फोटो एडिट करुन बदनामीकारक मजकूर टाईप करत बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सम्राट सहदेव गवळी वय २२, मुळ रा.लांजा सध्या रा.पाली,रत्नागिरी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याने प्ले स्टोअर वरुन कॅश वर्ल्ड ऑनलाईन लोन अॅप डाउनलोड केले होते.
त्यावरुन २ हजार २७७ रुपये लोन घेउन त्या लोनचे ७ दिवसांनंतर ३ हजार ७९६ रुपये भरावे लागणार होते. त्या प्रमाणे सम्राट गवळीने लोन घेउन ७ दिवसानंतर पैसे भरलेही होते. परंतू पैसे भरुनही त्याच्याकडे जास्तीच्या पैशांची मागणी करण्यात आली होती. आणि जेंव्हा त्याने पैसे भरण्यास नकार दिला तेंव्हा सदरच्या अज्ञाताने त्यांना फोन करुन तू अॅप लाउनलोड करतेवेळी आम्हाला मिडिया परमिशन दिलेली आहे असे सांगितले. तसेच मोबाईल गॅलरीमध्ये असेलेला सम्राट गवळीचा फोटा एडीट करुन त्यावर बदनामीकारक काहीतरी मजकूर टाईप करुन त्याची बदनामी केली.
त्यामुळे सम्राट याने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांकडे त्याने संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी अधिकचा तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.