जिल्ह्यात महसूल विभागाचे अधिकारी आणि कामगिरी नक्कीच कौतुकास्पद ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या या विभागाची जबाबदारी जेवढी महत्वाची असते तेवढीच ती कामे योग्य मार्गदर्शनाखाली करून घेणे सुद्धा आवश्यक असते. रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात उत्कृष्ट अधिकारी म्हणून येथील उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी तर मंडळ अधिकारी उमेश गिज्जेवार यांची निवड करण्यात आली आहे. सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी या तीन अधिकाऱ्यांना महसूल दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. एन. बी. पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
गेल्या ३ वर्षांपासून आलेल्या नैसर्गिक संकटांवर प्रभावीपणे मात करून, येथील महसूल विभागात उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी व मंडळ अधिकारी उमेश गिज्जेवार कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांनी कोरोना कालावधीमध्ये देखील मोठे योगदान दिले होते. गतवर्षी चिपळूण आणि इतर तालुक्यामध्ये आलेला महापूर, त्यानंतर राबविण्यात आलेल्या उपाययोजना या साऱ्यांची दखल घेण्यात आली. अनेकांची महापुरामध्ये वाहून गेलेली, खराब झालेली कागदपत्रे देखील लवकरात लवकर मिळण्यासाठी या अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे व्यवस्थापन केले. दरडग्रस्त भागात लोकसहभागातून पुनर्वसन झालेल्या लोकांना पक्की घरे बांधून देण्यात आली. त्याचबरोबर दरडग्रस्त भागात आपत्ती विषयक विविध उपाय योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या.
ग्रामस्थांमध्ये आलेल्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. धनगर समाजासाठी तर प्रांताधिकाऱ्यांनी अनोखेच अभियान राबवले. धनगर समाजातील शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळण्यासाठी प्रशासन आपल्या तांत्रिक उपकरणांसह धनगर समाजाच्या वाडीवस्तीवर पोहोचले. एकावेळी सुमारे ५५० दाखले वितरीत करण्यात आले. धनगर समाजाच्या इतिहासामध्ये हि विशेष आणि महत्वाची बाब ठरली आहे.
कोरोना, महापूर अथवा वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याबाबत त्यांनी तत्काळ महत्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी या तिन्ही अधिकाऱ्यांनी महसूल विभागात केलेल्या कार्यतत्पर, समयसूचक आणि प्रामाणिक सेवेची दखल घेत त्यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड जाहीर केली आहे.