जिल्ह्यात पावसाचा जोर आता कमी झाला असून, घाट माथ्यावर दरडी कोसळण्याचे प्रकारही आता बंद झाले आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो चाकरमान्यांचे परशुराम घाटातून आगमन होणार असल्या कारणाने जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देत आजपासून परशुराम घाटातील वाहतूक २४ तास सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेवल्याने आता गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्याची विविध मार्गे एन्ट्री सुरू झाली आहे. अशातच जिल्हा प्रशासनाने महामार्ग आणि घाटांबद्दल मोठा निर्णय घेत चाकरमान्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी २४ तास खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चाकरमान्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ प्रमाणे परशुराम घाटातील वाहतूक चोवीस तास सुरू करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आज २४ ऑगस्ट २०२२ पासून परशुराम घाटातील सर्व प्रकारची वाहतूक २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याच वर्षीच्या सुरुवातीला पावसाळयापूर्वी परशुराम घाटामध्ये महामार्ग चौपदरीकरणाच्या अनुषंगाने रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि रत्नागिरी यांच्या वेळोवेळीच्या अहवालानुसार हे काम पूर्ण झालेले नाही. मुंबईतील भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशाराही दिलेला होता.
अतिवृष्टीच्या कालावधीत परशुराम घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी दिनांक १४/०७/२०२२ पासून ते पुढील आदेशापर्यंत सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यास तसेच सायंकाळी ७ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यास अटी शर्तीच्या अधीन करण्यात यावी असे आदेश निर्गमित करण्यात आले होते.