रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढले आहेत. त्यातही मुनष्यावरील हल्ल्याचे प्रकारही अधुनमधून होत आहेत. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी अथवा शेतकरी कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या मदत निधीत पाच लाखाची वाढ करण्यात आली आहे. अर्थसहाय्य वाढल्याचा फायदा नागरिकांना किंवा जनावरांच्या मालकांना होणार आहे. यापूर्वी १५ लाखांचे अर्थसहाय्य दिले जात होते, आता ते वीस लाख दिले जाणार आहे.
वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांसह इतर व्यक्तींवर देखील अनेकदा जीव गमावण्याची वेळ येते. बऱ्याचदा अशा घटनांमध्ये कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते आणि अनेक आर्थिक अडचणींन सामोरे जावे लागते. त्यामुळे अगोदर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात होते. परंतु, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. यापैकी दहा लाख रुपये हे देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाच्या माध्यमातून व उरलेले दहा लाख रुपये ही त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यात ठेव रक्कम जमा करणार आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या ६० हजार रुपये रकमेत देखील वाढ करून ती ७० हजार केली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या १० हजार रुपये रकमेत वाढ करून ती १५ हजार रुपये केली आहे. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास देण्यात येणारी १२ हजार इतकी रक्कम वाढवून १५ हजार रुपये केली. गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास देण्यात येणारी ४ हजारावरुन ५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.