एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये सातत्याने धुसफुस सुरु आहे. कोकणातील दोन मंत्री उदय सामंत आणि रामदास कदम हे आक्रमकपणे शिंदे गटाची बाजू लावून धरत आहेत. काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांना इशारा दिला होता. आदित्य ठाकरे आता ३१ वर्षांचे आहेत. माझं राजकारणातील वय ५२ वर्षे आहे. आपलं वय काय, आपण काय बोलतोय, आपण ठाकरे कुटुंबातील व्यक्ती आहोत, याच आदित्य ठाकरे यांनी भान बाळगलं पाहिजे.
उद्धव ठाकरेंना जे काही मिळाले, ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मिळाले. आदित्य ठाकरेंना जे पक्षात, सत्तेत जे स्थान मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून मिळाले असल्याचे सांगत पक्ष संघटना कुणी वाढवली? असा सवाल कदम यांनी केला आहे. पक्ष संघटना आपल्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी वाढवली असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
त्यातच रत्नागिरी नाखरे येथे शिवसेनेच्या बॅनरखाली देवदेवस्की आणि करणी करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या बॅनर समोर कोहळा, लिंबू, तांदूळ आणि अन्य वस्तू सापडल्या आहेत. या घटनेचा पावस विभागातील शिवसेनेच्या विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांनी निषेध केला आहे. गद्दारीच्या राजकारणानंतर वातावरण तापले आहे ते थेट आता देवदेवस्कीपर्यंत पोहचले आहे.
राजापूर येथे मंत्री उदय सामंत यांचे काल बॅनर शिवसेनेकडून फाडण्यात आले होते. त्यानंतर आता रत्नागिरी तालुक्यातील पावस विभागात नाखरे येथे शिवसेनेच्या बॅनर खाली भलत्याच वस्तु सापडल्याने खळबळ उडाली आहे. नाखरे भागात अशा प्रकारचे चित्र दिसून आले आहे. नाखरे येथे गणेशभक्तांच्या स्वागतासाठी शिवसेनेने चार बॅनर लावले होते. त्या बॅनरसमोर रात्रीच्या वेळी देवदेवस्की करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. बॅनरसमोर कोहळा, लिंबु, पाने, तांदूळ ठेवण्यात आले आहेत. देवदेवस्कीसाठी वापरलेल्या वस्तू पाहिल्यानंतर हे कृत्य करणारा कोण? याबाबत चर्चा रंगली आहे.

