आठवडाभराच्या विश्रांती नंतर दमदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मच्छिमारीला पूरक वातावरण मिळत नसल्याने, अनेकांच्या नौका किनाऱ्यावरच आहेत. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले आहे.
त्यातच दक्षिणेकडून वाहणार्या वेगवान वार्यामुळे खोल समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. हर्णैतील नौका आंजर्ले खाडीत आश्रयाला असून जयगड, कासारवेली, मिरकरवाडा, नाटे, गुहागरमधील बहुसंख्य मच्छिमारांनी बंदरातच नौका उभ्या करून ठेवणे पसंत केले आहे. १४ सप्टेंबरला ही परिस्थिती राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर धोका पत्करून मासेमारीला गेलेल्यांना पर्ससीन नेट, ट्रॉलिंगवाल्या नौकांना उष्टी बांगडीसह, गेदर मासा मिळत आहे.
हवामान विभागाने तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण किनारपट्टीवर हलके वारे वाहत असून पाण्यालाही प्रचंड करंट आहे. गेले २ – ३ दिवस ठिकठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. वादळामुळे खोल समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. या परिस्थितीमध्ये खोल समुद्रात जावून मासेमारी करणे शक्य नाही. अनेक मच्छिमारांनी नौका किनार्यावर उभ्या करून ठेवल्या आहेत.
मागील दोन वर्षापासून वादळ, अतिवृष्टी, महापूर अशा अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा जनता सामना करत आहे. त्यामुळे तसं पाहायला गेल तर, मागील दोन वर्षापासूनच मासेमारी व्यवसाय तोट्यात चालला आहे. यंदाच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाच्या दोन महिन्यांमध्ये मासेमारी करताना बदलत्या वातावरणाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मासळी देखील मिळताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. आर्थिक समीकरण पूर्णत: डगमगून गेले आहे.