निष्ठायात्रेच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. पूर्वीचे विश्वासू सहकारी आणि युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे. आदित्य ठाकरेंच्या युवासेनेतील एकमेव आमदार योगेश कदम शिंदे गटात गेले. ते शिंदे गटात जाण्याआधी दोन वर्षापासून दापोली मतदार संघात माजी पालकमंत्री अनिल परब आणि आमदार योगेश कदम यांच्यातील वाद खदखदत होता. हा वाद अगदी मातोश्रीपर्यंत गेला; परंतु तेव्हा मातोश्रीकडून कोणतीही सहाय्यक भूमिका घेण्यात न आल्याने,आमदार योगेश कदमांची नाराजी दापोली मतदार संघातून शिंदे गटाला बळ देण्यास पूरक ठरली होती. यामुळे आदित्य ठाकरेंच्या दापोली दौऱ्याला अधिक महत्त्व आहे.
चिपळूणमध्ये माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही बंडखोरी केल्यामुळे चिपळुणात आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. सेनेतील पूर्वीच्या या दोन विश्वासू सहकाऱ्यांबद्दल आदित्य ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर कोण नेते उपस्थित राहतात, याचीही उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. चिपळूणमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शिवसेनेच्या शहर कार्यालय परिसरात आदित्य ठाकरेंचे जंगी स्वागत करण्याचे पूर्वनियोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून चव्हाण दोनवेळा आमदार झाले. सुरवातीच्या भाजप-शिवसेना युतीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांनी त्यांचा पराभव केला. त्याचवेळी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आणि सदानंद चव्हाण सक्रिय राजकारणातून देखील आपसूकच बाजूला फेकले गेले. पक्षातील लोकांकडूनच दुलर्क्ष होऊ लागल्याची खंतवजा तक्रार त्यांनी पक्ष सोडताना बोलून दाखवली होती. त्यामुळे चव्हाण यांच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरे यांची काही महिन्यांपूर्वी दापोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभा झाली होती. त्याच ठिकाणी आता निष्ठायात्रेची सभा होणार आहे. या सभेतून आदित्य ठाकरे रामदास कदम व आमदार योगेश यांनी केलेल्या गद्दारीलाही उत्तर देणार आहेत.