कोविड काळापासून ऑनलाईन शिक्षण पद्धत निर्माण झाल्याने मागील दोन वर्ष शिक्षणासोबत काही प्रकारे हेळसांडच झाल्याचे लक्षात येते. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांसाठी देखील हि पद्धती नवीन असल्याने शासनाच्या नियमानुसार, अशा प्रकारे काम सुरु ठेवण्यात आले होते. शिक्षण पद्धतीमध्ये थोडा बदल करण्यात येत आहे.
आगामी शैक्षणिक वर्षापासून मुलांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याच्या विचार सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. हे माझे व्यक्तिगत मत आहे. याबाबत शिक्षक संघटना, संस्थाचालक यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल,” असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळात केसरकर यांनी शुक्रवारी शिक्षण विभागाचा आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘मुलांवर अभ्यासाचे ओझे होऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास योग्य प्रकारे झाला पाहिजे. तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटकन समजेल असे शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही,’’ असे सांगत पुढील शैक्षणिक वर्षापासून गृहपाठ बंद करण्यात येण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
पुढील वर्षीपासून पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना असणाऱ्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात येणार आहेत. यामध्ये कोरी पाने उत्तरे लिहिण्यासाठी दिली जाणार आहे. शाळेतच नोट्स काढून विद्यार्थ्यांना अभ्यास घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे सुद्धा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा हेतू असल्याचे केसरकर यांनी सांगितले.